
बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन, बालवाडी विभागामध्ये ‘अंकुर’ वर्गाची पालक कार्यशाळा दिनांक ४ सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. बालशिक्षण तज्ज्ञ मारिया मॉन्टेसरी यांचा जन्मदिन आणि ताराबाई मोडक यांचा स्मृतिदिन याचे औचित्य साधून या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेची सुरुवात ‘आम्ही प्रकाश बीजे’ या प्रार्थनेने झाली. त्यानंतर मारिया मॉन्टेसरी आणि ताराबाई मोडक यांच्या प्रतिमेस पालकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला. बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर यांनी प्रास्ताविक करताना पालक कार्यशाळेचा हेतू, गरज आणि त्याची उपयुक्तता स्पष्ट केली.
मार्गदर्शन सत्रात शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले यांनी ‘मूल अनुभवातून कसं शिकतं?’ यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शिक्षण संयोजिका नीला आपटे यांनी पालकांनी मुलांशी कसे वागावे? हे एका सुंदर गाण्यातून सांगत, मुलांच्या क्षमता समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन कसे द्यावे? हे खेळाच्या माध्यमातून समजून सांगितले .
बालवाडी शिक्षिका सुनिता पाटील यांनी मुलांच्या भावनिक विकासामध्ये पालक आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर प्रकाश टाकला.
या कार्यशाळेत पालकांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्यासाठी त्यांना मिळालेल्या बॅचनुसार ६ गट पाडण्यात आले. बालवाडीतील सहा विषयांनुसार पालकांना सहा वर्गांमध्ये पाठवून विषयांचे निरीक्षण व स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले. यादरम्यान शिक्षक आणि पालकांमध्ये विषयाला अनुसरून समृद्ध संवाद झाला. विषयांची मांडणी करताना इंद्रिय विकास – नयन परमोजी, भाषिक विकास -अश्विनी हलगेकर व प्रतिभा चौथे, गणिती विकास-श्रद्धा पावशे व सुनीता पाटील, परिचय पाठ – वरदा देसाई, जीवन व्यवहार – भारती शिराळे, कलानुभव – रेणू पवार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. खेळ, कृतीयुक्त गाणी, अभ्यासक्रम समजून घेणे आणि पालक-शिक्षक संवाद यावर या कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
या प्रसंगी बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका निला आपटे आणि शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व बालवाडी शिक्षिका, तसेच कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. श्रद्धा पावशे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Belgaum Varta Belgaum Varta