Sunday , September 20 2026
Breaking News

शिक्षक दिन विशेष : गवाळी ज्ञानवाटेवरील ‘वटवृक्ष’!

Spread the love

 

तीन नद्या, दोन साकव आणि ४० फुटांचा पूल पार करून २३ वर्षे ज्ञानदान; कुटुंबापासून दूर राहून शिक्षक शामराव जाधव यांची अविरत शिक्षणसेवा

– राधिका सांबरेकर यांजकडून 

बेळगाव : मातीच्या लहानशा गोळ्याला सुंदर आकार देणाऱ्या कुंभाराप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे शिक्षक, स्वतः प्रकाशमान राहून इतरांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखविणारे शिक्षक… म्हणूनच शिक्षक हे समाजातील सदैव वंदनीय व्यक्तिमत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणे, जीवनमूल्यांची शिकवण देणे आणि नव्या जगाची ओळख करून देणे, ही शिक्षकांची खरी ओळख आहे.
याच शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ५ सप्टेंबर शिक्षक दिन. भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शहरांपासून दूर, जंगलाच्या कुशीत आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या एका शिक्षकाच्या कार्याचा हा वेध.

गवाळी ‘ज्ञानाचे वटवृक्ष’

खानापूरपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर, भीमगड अभयारण्याला लागून असलेल्या गवाळी या दुर्गम गावात मागील २३ वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारे शिक्षक शामराव जाधव हे खऱ्या अर्थाने या गावाचे ‘ज्ञानाचे वटवृक्ष’ ठरले आहेत.
गवाळी गावात पोहोचणे म्हणजे आजही एखाद्या साहसापेक्षा कमी नाही. शाळेत जाण्यासाठी तीन नद्या पार कराव्या लागतात, दोन लाकडी साकव ओलांडावे लागतात आणि मांडवी नदीवरील सुमारे ४० फूट उंच लोखंडी पूल पार करावा लागतो. पावसाळ्यात हा प्रवास आणखी खडतर बनतो.
मात्र, निसर्गाच्या आणि भौगोलिक परिस्थितीच्या या सर्व आव्हानांना न जुमानता जाधव सरांची ज्ञानयात्रा गेली २३ वर्षे अखंड सुरू आहे.

२००४ पासून अविरत ज्ञानसेवा

सन २००४ मध्ये शामराव जाधव यांची गवाळी येथील सरकारी उच्च मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सुरुवातीच्या काळात परिस्थिती अत्यंत कठीण होती. २०१० पर्यंत खानापूरपासून शाळेपर्यंतचा प्रवास त्यांना अनेकदा पायीच करावा लागत होता.
सध्या सुमारे १४ किलोमीटरपर्यंत डांबरी रस्ता उपलब्ध झाला असला तरी पुढील जवळपास १६ किलोमीटरचा मार्ग आजही कच्चाच आहे. या मार्गावर नियमित वाहतूक व्यवस्था नाही. तरीही रस्त्यांची दुरवस्था आणि प्रवासातील गैरसोयींनी जाधव सरांचा शिक्षणसेवेचा निर्धार कधीही डळमळीत होऊ दिला नाही.

शाळाच घर, विद्यार्थीच कुटुंब

गवाळी हे सुमारे ९० घरांचे आणि ४०० ते ५०० लोकसंख्येचे गाव आहे. जाधव सर शाळेत रुजू झाले, त्यावेळी येथे तब्बल ६५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. आज विद्यार्थ्यांची संख्या घटून १५ वर आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली म्हणून जाधव सरांची शाळेविषयीची निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही.

“शाळा हेच माझे घर आणि हे विद्यार्थीच माझे कुटुंब आहे,” असे ते भावनिकपणे सांगतात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत त्यांची नियुक्ती झाल्याने बदलीसंदर्भातील नियम वेगळे आहेत. मात्र, बदलीची संधी उपलब्ध झाली तरी या शाळेपासून दूर जाण्याची त्यांची इच्छा नाही.
मूळचे चंदगड तालुक्यातील माणगाव येथील असलेले जाधव सरांचे कुटुंब सध्या इचलकरंजी येथे स्थायिक आहे. मात्र, शिक्षणसेवेच्या ध्यासापोटी ते वर्षानुवर्षे कुटुंबापासून दूर राहून गव्हाळीतील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहेत.
“उदरनिर्वाहाचे माध्यम म्हणून ही शाळा माझ्या आयुष्यात आली. पण आज या शाळेने मला माझी ओळख दिली आणि शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडविण्याची संधी दिली. त्यामुळे शाळा जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत मी येथेच कार्यरत राहणार,” असा त्यांचा ठाम निर्धार आहे.

‘शाळा टिकली पाहिजे’ हाच ध्यास

एकेकाळी केवळ एका वर्गखोलीत चालणारी, चुन्याने रंगविलेली साधी शाळा आज जाधव सरांच्या प्रयत्नांतून अधिक प्रगत झाली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा त्यांच्या सर्वांगीण विकासाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
छत्रपती युवक मंडळाची स्थापना, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा सहभाग, संगीत व नाटकांचे प्रयोग, दारूबंदीबाबत जनजागृती आणि विद्यार्थी बचत बँक अशा विविध उपक्रमांमधून त्यांनी शिक्षणाला सामाजिक जाणीवेची जोड दिली आहे.
विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असली तरी शाळेचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांची धडपड आजही तितक्याच जोमाने सुरू आहे.
“जहाज बुडत असले तरी नावाड्याला उडी मारून पळता येत नाही. शेवटपर्यंत जहाज वाचविण्यासाठी प्रयत्न करणे हे त्याचे कर्तव्य असते. त्याचप्रमाणे या शाळेचे अस्तित्व टिकविण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार,” असे जाधव सर ठामपणे सांगतात.

निःशब्द सेवेचा खरा सन्मान

दुर्गम भाग, साधनसुविधांची कमतरता, कमी होत चाललेली विद्यार्थी संख्या, अपुरे रस्ते आणि कुटुंबापासून दूर राहण्याची वेदना… या सर्व अडचणींवर मात करून २३ वर्षे एका शाळेसाठी, एका गावासाठी आणि एका ध्येयासाठी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अविरत सेवा बजावणारे शामराव जाधव हे शिक्षक दिनाच्या खऱ्या अर्थाने आदरास पात्र ठरतात.
शहरांमध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम, सत्कार आणि भाषणे होतील. मात्र, गवाळीसारख्या दुर्गम गावात कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या जाधव सरांसारख्या शिक्षकांची निःशब्द सेवा हीच शिक्षक दिनाची खरी ओळख आणि खरा गौरव आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षक दिन विशेष : शाळाच घर अन् मेंडिलकरच कुटुंब; १३ वर्षांपासून ज्ञानदानाची अविरत सेवा

Spread the love  अतिथी शिक्षक नामदेव अनगोळकर यांची दुर्गम भागातील शिक्षणसेवा; गावकऱ्यांचे निस्वार्थ प्रेम हाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *