Sunday , September 20 2026
Breaking News

शिक्षक दिन विशेष : शाळाच घर अन् मेंडिलकरच कुटुंब; १३ वर्षांपासून ज्ञानदानाची अविरत सेवा

Spread the love

 

अतिथी शिक्षक नामदेव अनगोळकर यांची दुर्गम भागातील शिक्षणसेवा; गावकऱ्यांचे निस्वार्थ प्रेम हाच मोठा पुरस्कार

-राधिका सांबरेकर यांजकडून 

मेंडिल : खानापूर तालुक्यातील दुर्गम मेंडिल गावातील सरकारी प्राथमिक शाळेत गेल्या तब्बल १३ वर्षांपासून अतिथी शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करणारे नामदेव अनगोळकर यांनी शिक्षणसेवेत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शाळेतील एका खोलीतच वास्तव्यास राहून, स्वतःचा स्वयंपाक करत आणि प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत ते विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सातत्याने झटत आहेत.

खानापूरपासून सुमारे ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंडिल गावाची लोकसंख्या सुमारे ४५० आहे. रोजगाराच्या शोधात गावातील अनेक तरुण बाहेरगावी गेल्याने गावात प्रामुख्याने वयोवृद्ध नागरिक आणि मुले राहतात. अशा परिस्थितीत या दुर्गम गावातील मुलांना शिक्षणाची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अनगोळकर सर निष्ठेने करत आहेत.

मूळचे इदलहोंड गावचे असलेले नामदेव अनगोळकर सर गेल्या अनेक वर्षांत मेंडिल गावाशी पूर्णपणे एकरूप झाले आहेत. एकाच शिक्षकावर असलेल्या शाळेची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना ते केवळ अध्यापनापुरते मर्यादित राहत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही प्रयत्न करतात.

शाळाच घर, विद्यार्थ्यांमध्येच कुटुंब

‘शाळा हेच माझे घर’ या भावनेने अनगोळकर सर अत्यंत साधे जीवन जगत आहेत. तुटपुंजे मानधन मिळूनही त्यांनी शिक्षकी सेवेतील आपली निष्ठा कधीही कमी होऊ दिली नाही. विद्यार्थ्यांसाठी ते कधी आईची माया बनतात, कधी वडिलांचा आधार, तर कधी मोठ्या भाऊ-बहीणीप्रमाणे त्यांची काळजी घेतात.

दुर्गम गावातील शाळेत राहून विद्यार्थ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या अनगोळकर सरांबद्दल गावकऱ्यांमध्येही विशेष आपुलकी आहे. गावकरी त्यांना प्रेमाने ‘आमचा लेक’ असे संबोधतात.

मानधन किंवा इतर भौतिक सुविधांपेक्षा गावकऱ्यांकडून मिळणारे निस्वार्थ प्रेम, आपुलकी आणि विश्वास हाच आपल्या कार्याचा सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना अनगोळकर सर व्यक्त करतात.

मर्यादित साधनसुविधा, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि अनेक अडचणी असूनही गेल्या १३ वर्षांपासून मेंडिलच्या शाळेत ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवणारी नामदेव अनगोळकर यांची सेवा म्हणजे केवळ शिक्षकी पेशा नसून, गावाच्या भावी पिढीला घडविण्यासाठी सुरू असलेली एक निःस्वार्थ तपश्चर्याच आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षक दिन विशेष : गवाळी ज्ञानवाटेवरील ‘वटवृक्ष’!

Spread the love  तीन नद्या, दोन साकव आणि ४० फुटांचा पूल पार करून २३ वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *