


(-शिवानी पाटील यांच्याकडून)
गणेशोत्सव बदलतोय; मग विसर्जनाची शिस्त कधी येणार?
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर श्रद्धा, भक्ती, संस्कृती, परंपरा, संस्कार आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे स्वागत केले जाते. शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होते. अकरा दिवस पूजा-अर्चा, आरती, धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आणि विविध सामाजिक उपक्रम भक्तिभावाने पार पडतात. मंडळातील कार्यकर्तेही हा उत्सव आपल्या घरच्या कार्याप्रमाणे मनापासून साजरा करतात. मग याच गणरायाला निरोप देताना वेळेचे भान, शिस्त आणि नियोजन का हरवते, हा प्रश्न यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
बेळगावमध्ये यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल ४२ तासांहून अधिक काळ सुरू राहिली. एवढा प्रदीर्घ कालावधी ही केवळ वाहतूक किंवा गर्दी व्यवस्थापनाची समस्या नाही. त्यामागे मंडळांची शिस्त, मिरवणुकीचे नियोजन, प्रशासनाची कार्यक्षमता आणि उत्सवाच्या बदलत्या स्वरूपाचा गंभीर प्रश्न दडलेला आहे.
आज गणेशोत्सवाची भव्यता वाढत आहे. गणेशमूर्तींचा आकार वाढतोय, सजावट अधिक आकर्षक होत आहे, मोठमोठी वाहने मिरवणुकीत उतरतात. डीजे, रोषणाई, आतषबाजी आणि जल्लोषाला मोठे महत्त्व मिळत आहे. उत्साह असावा; पण या भव्यतेची किंमत जर विसर्जनाच्या वेळेत वाढ, वाहतूक कोंडी आणि व्यवस्थेवरील ताण या स्वरूपात मोजावी लागत असेल, तर उत्सवाच्या स्वरूपाचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.
मोठ्या मूर्तींमुळे विसर्जनाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. काही ठिकाणी मूर्तींना इजा पोहोचल्याच्या घटनाही घडतात. ज्या बाप्पाची अकरा दिवस मनोभावे पूजा केली जाते, त्याच बाप्पाला विसर्जनाच्या वेळी अव्यवस्थित नियोजनामुळे इजा होणे ही भक्तांसाठी निश्चितच वेदनादायी बाब आहे. त्यामुळे मूर्तीची उंची, आकार, वाहनाची रचना आणि विसर्जनाची व्यवस्था यांचा विचार मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वीच होणे आवश्यक आहे.
मात्र प्रश्न केवळ मोठ्या मूर्तींचा नाही. मिरवणुकीतील वेळेची शिस्त हा त्याहून गंभीर विषय आहे.
मंडपातून मूर्ती बाहेर काढल्यानंतर काही ठिकाणी मिरवणुकीत पुढे जाण्याऐवजी रस्त्याच्या कडेला किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर वाहने थांबवून ठेवली जातात. मिरवणूक अधिक वेळ चालावी, आपला जल्लोष अधिक काळ दिसावा, यासाठी अनावश्यक विलंब होतो. एका मंडळाने घेतलेला अतिरिक्त वेळ पुढील अनेक मंडळांच्या मिरवणुकीवर परिणाम करतो. परिणामी संपूर्ण विसर्जन मिरवणूक लांबणीवर पडते.
यातून वाहतूक कोंडी होते, नागरिकांची गैरसोय वाढते, पोलिसांवरील ताण वाढतो आणि शहराची संपूर्ण यंत्रणा अनेक तास ठप्प होते. एखाद्या मंडळाचा उत्साह किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न संपूर्ण शहराच्या व्यवस्थेवर परिणाम करणारा ठरू नये.
गणरायाला निरोप देताना भक्ती महत्त्वाची की मिरवणुकीतील दिखावा?
अकरा दिवस मुहूर्ताचे भान ठेवून पूजा-अर्चा करणारे कार्यकर्ते विसर्जनाच्या वेळी मात्र वेळेचे भान का विसरतात? डीजेच्या तालावर नृत्य, आतषबाजी आणि जल्लोषात वेळ निघून जातो. मिरवणूक कितीही लांबली तरी विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर मात्र गणरायासाठी आरत्या, पूजा आणि धार्मिक विधी करण्यासाठी वेळ काढला जातो. श्रद्धा आणि शिस्त यातील हा विरोधाभास नेमका कशासाठी?
गणेशोत्सव हा प्रतिष्ठेची स्पर्धा होण्याची गरज नाही. कोणाचा डीजे मोठा, कोणाची सजावट भव्य, कोणाची मूर्ती उंच किंवा कोणाची मिरवणूक अधिक वेळ चालली, यावर मंडळाची प्रतिष्ठा ठरू नये. भक्तिभावाने, सुरक्षितपणे आणि वेळेत गणरायाला निरोप देणे हेच खरे मंडळाचे कर्तव्य आहे.
महामंडळाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची
विसर्जन मिरवणुकीतील शिस्त राखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. गणेशोत्सव महामंडळाची भूमिकाही येथे अत्यंत महत्त्वाची ठरते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचेच पदाधिकारी महामंडळात असल्याने आपल्या मंडळांवर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत काहीवेळा मवाळ भूमिका घेतली जाते, अशी चर्चा आहे. ही बाब महामंडळाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मंडळांच्या अडचणी प्रशासनापुढे मांडणे जितके आवश्यक आहे, तितकेच मंडळांनी नियमांचे पालन करावे यासाठी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करणेही आवश्यक आहे.
महामंडळाने यापुढे केवळ ‘मंडळांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था’ न राहता ‘शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम गणेशोत्सवाची दिशा देणारी संस्था’ म्हणून भूमिका बजावली पाहिजे.
प्रत्येक मंडळाला मिरवणुकीची निश्चित वेळ, मार्ग, विसर्जनाचा कालावधी आणि आचारसंहिता स्पष्टपणे देण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनासोबत महामंडळानेही ठोस भूमिका घेतली पाहिजे.

Belgaum Varta Belgaum Varta