


१० ऑक्टोबरपर्यंत पितरांचे स्मरण; तिथीनुसार श्राद्धविधी करण्याची परंपरा
बेळगाव : भाद्रपद पौर्णिमेनंतर रविवार, दि. २७ सप्टेंबरपासून पितृपंधरवड्याला प्रारंभ होत आहे. भाद्रपद अमावस्येपर्यंत, अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंतचा हा कालावधी पितृपक्ष म्हणून पाळला जातो. यालाच ‘महालय’ असेही म्हटले जाते. यंदा पितृपंधरवडा दि. २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान पाळला जाणार आहे.
पितृपक्षातील प्रत्येक तिथीला त्या तिथीनुसार दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे. पितृकार्य करण्यासाठी हा कालावधी विशेष महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून सर्वपित्री अमावस्येपर्यंत दररोज महालय श्राद्ध करता येते.
पूर्वजांच्या आत्म्यांना शांती लाभावी, त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहता यावी, या भावनेतून पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोजन तसेच दानधर्म केला जातो. अनेक कुटुंबांमध्ये दिवंगत व्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते. मात्र, तिथी माहीत नसलेल्या किंवा काही कारणास्तव तिथीनुसार श्राद्ध करता न आलेल्या व्यक्तींचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करण्याचीही परंपरा आहे.
पितृपक्ष हा पितरांचे स्मरण, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी धार्मिक विधी करण्याचा काळ मानला जात असल्याने या कालावधीत शुभकार्ये टाळली जातात. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार अनेक कुटुंबांमध्ये या काळात महालय श्राद्ध, तर्पण व अन्य धार्मिक विधी केले जातात.
पितृपक्षाच्या निमित्ताने पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या संस्कारांचे स्मरण करण्याची ही परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta