


बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगावतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-२०२६’ यंदा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गणेश देवी (धारवाड) यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. लवकरच एका विशेष कार्यक्रमात गणेश देवी यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाचनालयातर्फे साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यापूर्वी ‘पानिपत’कार विश्वास पाटील (मुंबई), अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार (कोल्हापूर), उत्तम कांबळे (नाशिक), कॉ. कृष्णा मेणसे (बेळगाव), डॉ. सदानंद मोरे (पुणे), पद्मश्री मधु मंगेश कर्णिक (मुंबई), सतीश काळसेकर (मुंबई), कुमार केतकर (मुंबई), विष्णू सूर्या वाघ (गोवा), डॉ. आ. ह. साळुंखे (सातारा), रावसाहेब कसबे (नाशिक), डॉ. राजन गवस (गारगोटी), मनस्विनी लता रवींद्र (मुंबई), प्रवीण बांदेकर (सावंतवाडी), महादेव मोरे (निपाणी), अॅड. रमाकांत खलप (गोवा), प्रा. कृष्णात खोत (कोल्हापूर) आणि लक्ष्मीकांत देशमुख (पुणे) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा पुरस्कार पद्मश्री गणेश देवी यांना जाहीर झाल्याने साहित्य क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta