


बेळगाव : विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडीच्या कारवाया अधिक होत असल्याचा आरोप होत असताना, ‘यामागे आमच्याच लोकांचे षड्यंत्र आहे’, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रतिक्रिया दिली.
रविवारी बेळगाव येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सवदी म्हणाले की, सतीश जारकीहोळी यांनी कोणत्या अर्थाने हे वक्तव्य केले, याची आपल्याला माहिती नाही. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आणि त्यामागील संदर्भ त्यांनीच स्पष्ट करावा. मला याबाबत विचारल्यास मी यावर काय बोलणार, असे सवदी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ईडीच्या कारवायांबाबत सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वीही प्रतिक्रिया दिली असून, नोटीस आल्यास त्याला उत्तर देऊ, असे त्यांनी म्हटले होते.
बंगळुरूतील वाढत्या गर्दीवर सवदींचे भाष्य
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदारांच्या ‘दोन पत्नी’ असल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता सवदी यांनी त्याचा संबंध बंगळुरूतील वाढत्या लोकसंख्येशी जोडला.
रोजगारासह विविध कारणांसाठी मोठ्या संख्येने लोक बंगळुरूत येऊन स्थायिक होत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या वाढत असून वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केले असल्याचे सवदी म्हणाले.
भाजप नेत्यांच्या आक्षेपांबाबत बोलताना त्यांनी, ‘कुंभळा चोराने खांद्याला हात लावल्यासारखे झाले आहे,’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.
नंदिनी दूध दरवाढीवर लवकरच निर्णय
नंदिनी दूधाच्या दरवाढीबाबत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून, पुढील चार-पाच दिवसांत नवीन दर निश्चित होण्याची शक्यता असल्याचे सवदी यांनी सांगितले.
दूध संघांनी प्रतिलिटर ८ ते १० रुपयांची दरवाढ करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. दर निश्चित करताना केवळ ग्राहकांचे हित न पाहता दूध उत्पादक आणि संबंधित संघ-संस्थांच्या हिताचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
साखरेसाठी दोन प्रकारचे दर सुचवले
ऊस दरवाढीच्या मागणीवर बोलताना सवदी यांनी केंद्र सरकारने एफआरपी आणि एमएसपी निश्चित करताना शेतकरी, ग्राहक आणि साखर कारखान्यांचे हित लक्षात घ्यावे, असे म्हटले.
तसेच साखरेसाठी घरगुती आणि व्यावसायिक वापरानुसार स्वतंत्र दरव्यवस्था असावी, अशी सूचना त्यांनी केली. घरगुती ग्राहकांसाठी एक दर, तर शीतपेय आणि मिठाई उद्योगासारख्या व्यावसायिक वापरासाठी दुसरा दर निश्चित करता येईल. व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या धर्तीवर साखरेसाठीही दोन प्रकारचे दर लागू केल्यास संबंधित प्रश्नांवर तोडगा काढता येऊ शकतो, असे सवदी म्हणाले.

Belgaum Varta Belgaum Varta