Sunday , September 20 2026
Breaking News

दुर्गम धनगरवाड्याच्या ज्ञानज्योतीचा अखंड दीप

Spread the love

 

१५ वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत बाबुराव सावंत सरांची ज्ञानसेवा; ग्रामस्थांच्या विश्वासावर शाळेची वाटचाल

– राधिका सांबरेकर यांजकडून 

बेळगाव : शहरापासून काही अंतरावर शिक्षणाच्या विविध सुविधा सहज उपलब्ध असताना, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आजही शाळेपर्यंत पोहोचणे आणि शिक्षणाची दारे खुली ठेवणे हे मोठे आव्हान आहे. अशाच प्रतिकूल परिस्थितीत धनगरवाडा (धामणे-बैलूर) येथील सरकारी मराठी शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारे बाबुराव सावंत सर विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षक नसून शिक्षणाची वाट दाखविणारे आधारस्तंभ ठरले आहेत.

सन २०११ मध्ये सावंत सरांची धनगरवाडा येथील शाळेत नियुक्ती झाली. त्यानंतर दोन-तीन वर्षांचा अपवाद वगळता त्यांनी याच शाळेत सेवा बजावली. सन २०२१ पासून ते कायमस्वरूपी शिक्षक म्हणून येथे कार्यरत आहेत. मूळचे महिपाळगड येथील असलेले सावंत सर दररोज सुमारे ३० किलोमीटरचा प्रवास करून शाळेत पोहोचतात. मात्र, हा प्रवास केवळ अंतराचा नसून दुर्गम भौगोलिक परिस्थितीशी दररोज झुंज देणारा आहे.

बेळगावपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेले धनगरवाडा हे बेळगाव जिल्ह्यातील चारही बाजूंनी महाराष्ट्राच्या हद्दीने वेढलेले एकमेव गाव असल्याचे सांगितले जाते. धामणे-बैलूरपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर, स्वप्नवेल पॉईंटजवळ डोंगरदऱ्यांच्या परिसरात वसलेल्या या गावात सुमारे २१ कुटुंबे असून लोकसंख्या शंभर ते दीडशेच्या दरम्यान आहे. त्यापैकी सुमारे ७० नागरिक मतदानाचा हक्क बजावतात.

ग्रामस्थांच्या सहकार्याने उभी राहिली शाळा

गावातील मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सन १९९९ मध्ये शाळेची स्थापना करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेची इमारत उभी राहिली. मात्र, आजही शाळेला अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ता व्यवस्थित नसल्याने शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांनाही मोठी कसरत करावी लागते.

अशा प्रतिकूल परिस्थितीतही सध्या या शाळेत १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘सुविधा कमी असल्या तरी शिक्षणाची आस कमी होता कामा नये,’ या भावनेतून सावंत सर विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची आस्था आणि ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास व सहकार्य यामुळेच या दुर्गम भागातील शाळेची ज्ञानज्योत आजही अखंड तेवत आहे.

स्वतःच्या खिशातूनही शाळेसाठी खर्च

शाळेच्या विकासासाठी सावंत सर सातत्याने प्रयत्नशील आहेत. शाळेत सावंत सरांसोबत एल. जी. बाबली हे कन्नड शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, दुर्गम आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे विशेषतः महिला शिक्षकांसाठी येथे पोहोचणे मोठे आव्हान ठरते. त्यामुळे अनेकदा शाळेची मुख्य धुरा सावंत सरांनाच सांभाळावी लागते.

विशेष म्हणजे, शाळेतील मूलभूत सुविधांसाठी सावंत सरांनी स्वतःच्या खिशातूनही खर्च केला आहे. शाळेला दरवाजा बसविण्यासाठी त्यांनी स्वखर्च केला. शिक्षक म्हणून असलेल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन शाळेप्रती दाखविलेली त्यांची बांधिलकी यावरून स्पष्ट होते.

दानशूर व्यक्तींचाही मदतीचा हात

शाळेच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. त्याचबरोबर काही दानशूर व्यक्तींनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कुद्रेमणी गावचे सुपुत्र तसेच उद्यमबाग येथील उद्योजक व संचालक सदानंद वैजू धामणेकर यांनी वेळोवेळी शाळेला देणगीच्या स्वरूपात आर्थिक मदत केली आहे.

शाळेच्या विविध गरजा भागविण्यासाठी त्यांनी केलेल्या मदतीची सावंत सर आवर्जून आठवण काढतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.

गावातील अनेक नागरिक रोजगारासाठी गोव्याकडे जात असल्याने स्थानिक पातळीवर मनुष्यबळाचीही कमतरता जाणवते. तरीही सर्व अडचणींवर मात करून विद्यार्थी नियमितपणे शाळेत येतात आणि शिक्षण घेतात.

डोंगरदऱ्यांच्या कुशीत, सुविधांच्या अभावातही ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारी बाबुराव सावंत सरांची ही सेवा शिक्षकी पेशाच्या कर्तव्यापलीकडची आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत शाळेची धुरा सांभाळणाऱ्या या शिक्षकाच्या कार्यातून एकच संदेश मिळतो –

“शाळा म्हणजे केवळ इमारत नव्हे, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याने जिवंत राहणारे ज्ञानमंदिर होय.”

 

About Belgaum Varta

Check Also

शिक्षक दिन विशेष : गवाळी ज्ञानवाटेवरील ‘वटवृक्ष’!

Spread the love  तीन नद्या, दोन साकव आणि ४० फुटांचा पूल पार करून २३ वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *