


बेळगाव : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेतलेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बेळगाव जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपद द्यावे, याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील मंत्रिपदाच्या संभाव्य दावेदारांबाबत त्यांनी आपली भूमिका मांडल्याचे समजते.
बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस वाढली आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच आमदार अशोक पट्टण आणि महांतेश कौजलगी यांच्यात मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सतीश जारकीहोळी हे जिल्ह्यातील दोन नेत्यांसाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार पाठपुरावा करत असल्याची चर्चा आहे. अशोक पट्टण आणि महांतेश कौजलगी यांच्या नावासाठी ‘साहुकार’ यांनी हायकमांड पातळीवर चर्चा केल्याचे समजते. त्यांच्या या भूमिकेमुळे काही इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सतीश जारकीहोळी यांच्या हालचालींनंतर इतर इच्छुक नेत्यांनीही दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. आता ‘सावकार’ यांची रणनीती यशस्वी ठरल्यास अशोक पट्टण किंवा महांतेश कौजलगी यांच्यापैकी एकाला मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta