Monday , September 21 2026
Breaking News

बापट गल्लीतील फुटलेल्या ड्रेनेज झाकणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Spread the love

 

बेळगाव : शहरातील नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना रोजच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच बापट गल्ली येथील कॉर्नरवर अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे झाकण फुटलेल्या अवस्थेत असून वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने रस्ते, गटारे आणि इतर मूलभूत सुविधांची दुरुस्ती व देखभाल करणे अपेक्षित असताना बापट गल्लीतील हा धोकादायक प्रकार प्रशासनाच्या उदासीनतेची साक्ष देत आहे. फुटलेल्या ड्रेनेज झाकणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला असून कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बापट गल्ली हा शहरातील गजबजलेला व्यापारी परिसर असून येथे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच मार्गावरून दररोज ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, पादचारी तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे फुटलेल्या झाकणामुळे अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभाग आणि नगरसेवकांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने या धोकादायक परिस्थितीची दखल घेऊन ड्रेनेजच्या झाकणाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक आणि व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *