Friday , August 21 2026
Breaking News

सरकारी रुग्णालयांना मोठा दिलासा; 200 डॉक्टरांसह 1,200 निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची होणार भरती

Spread the love

 

बेळगाव : सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची कमतरता, अपुरी वैद्यकीय यंत्रणा आणि रुग्णसेवेतील अडचणींमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या घटना समोर येत असताना राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांसाठी 200 डॉक्टरांची कायमस्वरूपी थेट नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्यमंत्री यु. टी. खादर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात 200 डॉक्टरांची भरती केली जाणार असून त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णसेवेला मोठा दिलासा मिळणार आहे.

ही भरती प्रक्रिया कर्नाटक एक्सामिनेशन अथोरिटी (केईए) मार्फत राबविण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना अवघ्या एका आठवड्यात नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्थ खात्याने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या सुमारे 1,280 डॉक्टरांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. याशिवाय रुग्णालयांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही मोठी उणीव आहे. त्यामुळे डॉक्टरांसोबतच परिचारिका, फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांची भरती करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

याअंतर्गत केईएमार्फत 400 परिचारिका, 400 फार्मासिस्ट आणि 400 लॅब टेक्निशियन, अशा एकूण 1,200 निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. या निर्णयामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळण्याबरोबरच रुग्णांना दर्जेदार आणि वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी रुग्णालये हेच उपचारांचे प्रमुख केंद्र असते. मात्र मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेकदा रुग्णांना खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागतो. नव्या भरतीमुळे सरकारी रुग्णालयांतील सेवा अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. :

About Belgaum Varta

Check Also

माजी मंत्री बी. सी. नागेश यांचे निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Spread the love  तुमकूर : माजी शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. सी. नागेश (६७) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *