बेळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गृहलक्ष्मी’ मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणीनंतर राज्यातील तब्बल 4.30 लाख लाभार्थी अपात्र आढळून आले असून त्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत.
महागाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन राज्य सरकारने कुटुंबप्रमुख महिलांना दरमहा दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची गृहलक्ष्मी योजना सुरू केली होती. या योजनेचा लाखो महिलांना लाभ झाला असला, तरी चुकीची माहिती सादर करून काही जण लाभ घेत असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष पडताळणी मोहीम हाती घेत अर्जांची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबांचा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा तसेच मृत व्यक्तींच्या नावावरही लाभ घेतला जात असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज करून योजनेचा लाभ घेतल्याचेही उघड झाले.
तपासणीनंतर अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली असून राज्यभरात 4.30 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. दरम्यान, अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याने नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहलक्ष्मी योजनेतील गैरप्रकारांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta