बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या लढ्याला पुन्हा एकदा वेग देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलावण्यात यावी, या मागणीसाठी मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला असून, या आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
सीमाप्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समिती, विधिज्ञ समिती आणि तज्ज्ञ समितीच्या बैठका दीर्घकाळ झालेल्या नसल्याने सीमालढ्याला अपेक्षित गती मिळत नसल्याची नाराजी समितीने व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या कायदेशीर लढ्यालाही याचा फटका बसत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक २५ जून रोजी पार पडल्यानंतर शासनस्तरावर उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती असली, तरी प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
आंदोलनाला व्यापक राजकीय पाठिंबा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस, मनसे तसेच अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने आणि राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांनाही पत्राच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, प्रशासकीय अडचणी आणि सीमा प्रश्नाची रखडलेली स्थिती याकडे महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. तसेच सीमा प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन शासनाने मराठी भाषिकांच्या अपेक्षांना न्याय द्यावा, असेही समितीने म्हटले आहे.
दरम्यान, २९ जून २०२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षांनी आणि मराठी बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन समितीने केले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर किनेकर आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta