Wednesday , June 17 2026
Breaking News

मृत्यूचे स्मरण जितके प्रभावी तितके पापाचे विस्मरण अधिक दृढ : आचार्य राजरक्षितसूरीजी

Spread the love

 

बेळगाव : श्री संभवनाथ जिनालय जैन संघ, बेळगाव येथे आचार्य राजरक्षित सुरजी महाराज यांचे प्रवचन झाले.

आपल्या प्रदर्शनात महाराजांनी सांगितले की, “सूर्योदयाची वेळ निश्चित असते. सूर्यास्त कधी होणार हे आपल्याला माहित असते. रेल्वे स्थानकावर गाडी येण्याची आणि जाण्याची वेळ ठरलेली असते. फुले कोमेजण्याची आणि दूध फाटण्याची वेळही निश्चित असते. परंतु मृत्यू कधी येईल, हे कोणालाही माहित नसते. तो बालपणातही येऊ शकतो आणि तारुण्यातही.

मृत्यूला गाव-परगाव, शुभ दिवस-अशुभ दिवस असा कोणताही भेद नसतो. मृत्यू म्हणजे बाहेर गेलेला श्वास पुन्हा आत न येणे. जीवन कोणत्याही प्रयत्नाने वाढवता येत नाही, पण ते निश्चितच सुधारता येते. मृत्यूचे स्मरण जितके प्रबळ होते, तितके पापाचे विस्मरण अधिक मजबूत होते. असे ते म्हणाले

महाभारता बाबत बोलताना ते म्हणाले की, महाभारतातील एका प्रसंगात यक्षराजाने युधिष्ठिराला विचारले, “या जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते?” युधिष्ठिर म्हणाला, “दररोज शेकडो लोक मृत्यू पावून स्मशानात जात आहेत, तरीही उरलेले लोक असे मानतात की ‘मी मरणार नाही.’ यापेक्षा मोठे आश्चर्य दुसरे कोणतेही नाही.”

मृत्यू सर्वांसाठी समान आहे. संत असो वा दुष्ट, श्रीमंत असो वा गरीब, सुशिक्षित असो वा अशिक्षित, पुरुष असो वा स्त्री—तो कोणताही भेदभाव करत नाही. जन्माच्या वेळी आणि मृत्यूच्या वेळी अंगावर घातल्या जाणाऱ्या वस्त्रांना एकही खिसा नसतो. तरीही माणूस संपूर्ण आयुष्य पेट्या, तिजोऱ्या आणि लॉकर भरत राहतो.

जेव्हा डॉक्टर म्हणतात, “क्षमस्व, आता शरीर रुग्णालयातून घेऊन जा,” तेव्हा नातेवाईक सर्वप्रथम अंगठी, हार, कुंडले, कंगन यांसारखे दागिने काढून घेतात. शेवटी सोबत जातात ते फक्त पुण्य आणि पाप.

जसा अभियंता आराखडा तयार करतो आणि त्यानुसार इमारत उभी राहते, तसेच आपण चांगली कर्मे केली असतील तर सद्गती मिळेल, आणि वाईट कर्मे केली असतील तर दुर्गती प्राप्त होईल. या छोट्याशा जीवनात शरीराने तप करा, संपत्तीने दान करा आणि आपल्या सामर्थ्याने समाजहिताची कार्ये करा. असा सल्ला त्यांनी दिला

यावेळी पंडित श्री त्रिभुवनरत्न विजयजी म्हणाले की, दुःख आले तर समता आणि समाधान राखा, आणि सुख आले तर सद्बुद्धी राखा. जो मनुष्य सुखातही परमेश्वराचे स्मरण करतो, त्याला दुःखाचा त्रास कमी होतो. आणि जर दुःख आलेच, तर त्याला ते सहन करण्याची समता प्राप्त होते.

देव आणि गुरु यांच्याप्रती कधीही स्वार्थी बुद्धी ठेवू नका. परमात्मा आणि सद्गुरु यांच्याप्रती पूर्ण समर्पण असलेले मन अनेक सिद्धी आणि कल्याणकारी फळे प्राप्त करून देते.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांच्या फेस रिडिंग हजेरी प्रणालीचा पहिलाच दिवस गोंधळात; तांत्रिक अडचणींमुळे उपस्थिती नोंदविण्यात अडथळे

Spread the love  बेळगाव : सरकारी शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *