बेळगाव : यंदा मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरीप हंगामातील शेती कामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. त्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणीसह खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उष्णतेत वाढ झाली असून पिकांसमोर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.
साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होतो. मात्र जूनचा पंधरवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेती क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस लवकरच सुरू होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थांगपत्ता नसल्याने पेरलेल्या पिकांना आवश्यक ओलावा मिळत नाही.
सध्या पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असल्याने काही शेतकरी टँकर, विहिरी तसेच इतर उपलब्ध साधनांच्या मदतीने पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा उपाय सर्वांसाठी शक्य नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत.
भारतीय शेतीला “मान्सूनचा जुगार” असे संबोधले जाते. यंदाच्या परिस्थितीत त्याची प्रचिती पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आली आहे. आधीच शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसताना पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. परिणामी अनेक शेतकरी आकाशाकडे नजरा लावून पावसाची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
हवामान खात्याने यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता व्यक्त करत पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन केले होते. तरीही परंपरागत पद्धतीला प्राधान्य देत बहुतांश शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी केली. सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि झालेल्या पावसामुळे मान्सून सक्रिय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात पावसाने पाठ फिरवल्याने पेरलेली बियाणे जमिनीतच अडकून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक भागांत दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. गेल्या काही वर्षांत पावसाचे आगमन, वितरण आणि प्रमाण यामध्ये मोठे बदल होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे अधिक नियोजनपूर्वक आणि विचारपूर्वक करावी लागत आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आगामी पावसाकडे लागले असून मान्सून लवकर सक्रिय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta