खानापूर : ऐन पेरणीच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बैल ठार झाल्याने डिगेगाळी–जटगे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जटगे येथील शेतकरी राजाराम रामचंद्र पाटील यांचा बैल वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम पाटील हे आपल्या बैलासह डिगेगाळी परिसरातील शिवारात शेतीची कामे करण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास बैलाला चरावयासाठी मोकळे सोडण्यात आले असता झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातली. या भीषण हल्ल्यात बैलाचा जागीच मृत्यू झाला.
सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने बैलाचा मृत्यू हा शेतकऱ्यासाठी मोठा आर्थिक धक्का मानला जात आहे. शेतीची अनेक कामे बैलांच्या मदतीने केली जात असल्याने या घटनेचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली असून वाघाच्या वाढत्या वावराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, संबंधित शेतकऱ्याला योग्य आर्थिक नुकसानभरपाई द्यावी तसेच परिसरात गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे डिगेगाळी–जटगे परिसरात पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वन विभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta