Saturday , August 22 2026
Breaking News

हब्बनहट्टी खनिज वाहतूक प्रकरण तापले; विविध विभागांच्या भूमिकेवर संशय, चौकशीची मागणी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी परिसरात सुरू असलेल्या खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणाने नवे वळण घेतले असून, ओव्हरलोड वाहनांची वाहतूक, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि संबंधित शासकीय विभागांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हब्बनहट्टी परिसरातून मोठ्या प्रमाणात खनिजाची वाहतूक सुरू असून अनेक वाहने निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त वजन घेऊन धावत असल्याचा आरोप आहे. परिणामी ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर वाताहात होत असूनही पोलीस आणि आरटीओ विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीही या विषयावर मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

हब्बनहट्टी परिसर हा पश्चिम घाट क्षेत्रात येत असल्याने केंद्र सरकारच्या पर्यावरणविषयक अधिसूचनांच्या पार्श्वभूमीवर या भागात खनिज उत्खननासाठी परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे खाण व भूविज्ञान विभाग तसेच पर्यावरण विभागाच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिकांकडून आणखी एक गंभीर दावा करण्यात आला आहे. लॅटराईट उत्खननासाठी परवानगी देण्यात आली असताना प्रत्यक्षात उच्च दर्जाचे बॉक्साईट खनिज काढले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित खनिजातील अल्युमिना प्रमाण ३८ ते ४२ टक्क्यांपर्यंत असल्याची माहिती समोर येत असून, अशा परिस्थितीत खनिज नमुन्यांची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची जबाबदारी खाण व भूविज्ञान विभागाची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, वन विभागाने या प्रकरणात कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात सुरू असलेल्या हालचालींबाबत विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नसल्याने वन विभागाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या संपूर्ण प्रकरणात पोलीस विभाग, आरटीओ, खाण व भूविज्ञान विभाग, पर्यावरण विभाग, वन विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून, खानापूर ब्लॉक काँग्रेसकडून लवकरच संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या संदर्भातील आरोपांबाबत संबंधित विभागांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी निष्पक्ष चौकशीची गरज व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजीतील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; ४३ वर्षांनंतर एकत्र येत शाळांप्रती कृतज्ञता व्यक्त

Spread the love  गर्लगुंजी : गर्लगुंजी गावातील मराठी प्राथमिक शाळेच्या १९८१-८२ च्या इयत्ता सातवीच्या आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *