Sunday , September 20 2026
Breaking News

चिन्नास्वामी स्टेडियमची आसनक्षमता अपुरी; बेळगावातही सामने होणार : व्यंकटेश प्रसाद

Spread the love

 

बेळगाव : बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमची सध्याची आसनक्षमता वाढत्या क्रिकेटप्रेमींच्या मागणीसमोर अपुरी पडत असल्याची खंत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (KSCA) अध्यक्ष वेंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केली. स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी तयारी सुरू असून यासाठी राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावातील बी.के. मॉडेल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रसाद म्हणाले की, चिन्नास्वामी स्टेडियमची अधिकृत आसनक्षमता ३२ हजार असली तरी प्रत्यक्षात केवळ २७ हजार प्रेक्षकांनाच सामने पाहण्याची संधी मिळते. तसेच मैदानावर ३६० अंश कोनातून सामना पाहण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रेक्षकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे स्टेडियमच्या उन्नतीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. आगामी ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय तर डिसेंबरमध्ये टी-२० सामने बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी हुबळी येथे सुरू झालेल्या महाराजा ट्रॉफी स्पर्धेचा उल्लेख करताना त्यांनी राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचे महत्त्व वाढल्याचे सांगितले. तसेच हुबळीचे सुपुत्र अविनाश वैद्य यांची बीसीसीआयच्या व्यवस्थापकपदी झालेली निवड उत्तर कर्नाटकासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात महाराजा ट्रॉफीमध्ये आणखी नव्या संघांचा समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगावच्या केएससीए मैदानावर सामने का आयोजित केले जात नाहीत, या प्रश्नावर प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबतचा प्रश्न पूर्वीच्या व्यवस्थापन समितीला विचारायला हवा होता, असे सांगत त्यांनी बीसीसीआय सामन्यांच्या आयोजनात कोणताही भेदभाव झालेला नसल्याचे स्पष्ट केले. हुबळीमध्ये रणजी करंडकाचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला असून कलबुर्गी आणि रायचूरलाही समान प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावचे मैदान सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी योग्य नसले तरी बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धा आणि सराव सामने आयोजित करण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात बेळगावमध्ये निश्चितपणे क्रिकेट सामने आयोजित केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला अविनाश पोतदार, वादिराज पाटील, विलास जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *