Wednesday , July 29 2026
Breaking News

विमा रकमेसाठी माजी सैनिकाचा खून प्रकरण; प्रेयसीच्या प्रियकराचा धक्कादायक व्हिडिओ, प्रकरणाला नवे वळण

Spread the love

 

बेळगाव : हुकेरी तालुक्यातील घोडगेरी गावातील निवृत्त सैनिक संदीप मांजरी यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, मृताच्या पत्नीच्या कथित प्रियकराने केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी संदीप यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत पुंडलिक डोंबर याने एक सेल्फी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
व्हिडिओमध्ये पुंडलिक डोंबर याने सांगितले की, तो घोडगेरी येथे एग राईसचे छोटे दुकान चालवत होता. त्यावेळी संदीप मांजरी यांच्याशी त्याची ओळख झाली. निवृत्तीनंतर संदीप यांनी चहाचे दुकान सुरू केले होते. त्यानंतर संदीप यांच्या पत्नी सुमा हिच्याशी ओळख झाली आणि पुढे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचा दावा त्याने केला आहे.
डोंबर याने आणखी गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, सुमा घरात मोठ्या प्रमाणात मद्य आणि झोपेच्या गोळ्या ठेवत होती व त्या संदीप यांना देत होती. याबाबत विचारणा केली असता, “तो मेला तरी चालेल,” असे ती म्हणायची, असा आरोपही त्याने केला आहे.
संदीप मांजरी हे हुकेरी यात्रेवरून परतताना अपघातग्रस्त होऊन रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी सुमा हिने किडे मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध आणून देण्यास सांगितले होते. आपण ते औषध आणून दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संदीप यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत आपल्याला संशय असल्याचे डोंबर याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
तसेच, संदीप यांच्या नावावर दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर दोघांच्या मुलांना घेऊन बेळगावमध्ये स्थायिक होण्याचा प्रस्ताव सुमाने दिला होता, असाही आरोप त्याने केला आहे.
संदीप यांच्या मृत्यूनंतर आपण आणून दिलेले औषध आणि इतर वस्तू नष्ट करण्यास सांगितल्याचा दावाही डोंबर याने केला आहे. या प्रकरणाची सखोल पुनर्तपासणी करण्यात यावी तसेच तपास पूर्ण होईपर्यंत विम्याची रक्कम वितरित करू नये, अशी मागणी त्याने केली आहे.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुरुवारी संदीप मांजरी यांचा मृतदेह पुन्हा बाहेर काढून तपासणी केली आहे. घोडगेरी येथील या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून, तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

घराच्या उंबरठ्यावरच सोनसाखळीवर डल्ला; प्रसंगावधानामुळे अर्धे गंठण वाचले

Spread the love  बेळगाव : शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असून, गावावरून घरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *