Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात १९ जूनपासून “नो हेल्मेट; नो पेट्रोल” मोहीम लागू

Spread the love

 

बेळगाव : शहरातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “नो हेल्मेट; नो पेट्रोल” या उपक्रमाची अंमलबजावणी १९ जूनपासून करण्यात येणार असून, हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपांवर इंधन देण्यात येणार नाही.

या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ जून दरम्यान विशेष हेल्मेट जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करून सुरक्षित प्रवासाची सवय अंगीकारावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील सर्व पेट्रोल पंप चालक व मालकांना पत्र पाठवून या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार १९ जूनपासून शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर “हेल्मेटशिवाय इंधन मिळणार नाही” असे फलक लावण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांना हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे की, हा उपक्रम केवळ नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नसून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी आणि अपघातांमधील मृत्यू व गंभीर दुखापतींचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात येत आहे.

दरम्यान, शहरातील नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा तसेच रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करून या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *