Sunday , September 20 2026
Breaking News

20 वर्षांपासून बससेवेपासून वंचित गावांसाठी बस सुरू करण्याची मागणी; दलित संघर्ष समितीचे डेपो व्यवस्थापकांना निवेदन

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील मुडेवाडी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, सातनाळी, पिंपळी, मांजरपाई, माचाळी आणि घार्ली या गावांना गेल्या सुमारे 20 वर्षांपासून नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती (समन्वयक संघटना) यांच्या वतीने खानापूर येथील NWKSRTC बस डेपो व्यवस्थापक संतोष बेनकनकोप यांना निवेदन देऊन तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

समितीच्या निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित गावांतील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचण्यासाठी तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याची बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

या सर्व बाबींचा विचार करून संबंधित मार्गांवर नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात व ग्रामीण भागातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हा प्रधान कार्यदर्शी राजशेखर हिंडलगी, रवि मादार, बसवराज मादार, मंजुनाथ मादार, संजय देसाई, सुजाता देसाई, यल्लाप्पा खोत, पुंडलिक दळवी, मनोहर इंदोलकर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *