बेळगाव : जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा वाढता कल पाहायला मिळत असताना मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी शाळांचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी मजगाव येथील मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र. ३५ च्या वतीने विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.
“मातृभाषेतून शिक्षण, उज्ज्वल भविष्याचे दालन”, “मराठी शाळा वाचवा, मराठी भाषा टिकवा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावभर फेरी काढली. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास मुलांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासाला अधिक चालना मिळते, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
अलिकडच्या काळात मराठी शाळांची घटती पटसंख्या ही चिंतेची बाब बनली असून, मराठी शाळांकडे पुन्हा पालकांचा ओढा वाढावा, गावातील प्रत्येक बालकाने मातृभाषेतून शिक्षण घ्यावे आणि मराठी भाषेचा अभिमान जपावा, या उद्देशाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येऊन मराठी शाळांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत मराठी शिक्षणाच्या संवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मुख्याध्यापक पी. के. सुतार, व्ही. बी. गावडे, एन. बी. कडलीकर, एस. के. भातकांडे, एस. एस. केसरकर यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta