Sunday , August 23 2026
Breaking News

घनदाट जंगलात वाट चुकलेल्या वृद्धाला वनविभागाचे जीवदान; रात्रभर चाललेल्या शोधमोहीमेला यश

Spread the love

 

खानापूर : घनदाट जंगलात गुरे चारताना वाट चुकून बेपत्ता झालेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा वनविभागाने तब्बल दहा तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर सुखरूप शोध लावला. वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या भीमगडच्या जंगलात रात्रभर सुरू असलेल्या या धाडसी मोहिमेमुळे एका वृद्धाचे प्राण वाचले असून वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खानापूर तालुक्यातील हेम्मडगा येथील हेमंत मादार हे नेहमीप्रमाणे गुरे चरण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. मात्र संध्याकाळी गुरे घरी परतली, पण हेमंत मादार यांचा काहीच मागमूस लागला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने भीमगड वन्यजीव विभागाशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच भीमगड वन्यजीव विभागाचे आरएफओ नदाफ यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. एसीएफ बसवराज वाळद यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांची पाच विशेष पथके तयार करण्यात आली.

हिंस्र श्वापदांचा वावर असलेल्या आणि दाट झाडीने वेढलेल्या जंगलात रात्री आठ वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत सलग दहा तास शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर अथक प्रयत्नांनंतर हेमंत मादार यांचा शोध घेण्यात पथकाला यश आले. त्यांना सुरक्षितपणे जंगलातून बाहेर काढून कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

वनविभागाच्या या तातडीच्या आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला. जीव धोक्यात घालून रात्रभर शोधकार्य करणाऱ्या वनाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत असून या मोहिमेने वनविभागाच्या तत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केसरेकर कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या; आमदार हलगेकरांची मुख्यमंत्री डी. के. शिवकुमारांकडे मागणी

Spread the love  खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *