Friday , June 19 2026
Breaking News

शेतातून घरी परतताना तरुणावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती स्थिर

Spread the love

 

कणकुंबी : तालुक्यातील कणकुंबी वनक्षेत्रातील हुळंद गावाबाहेर बुधवारी संध्याकाळी शेतकाम आटोपून घरी परतत असताना एका २५ वर्षीय तरुणावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महेश बाबू गावडे हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश गावडे हे शेतातील काम पूर्ण करून घरी जात असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर झडप घातली. अस्वलाच्या हल्ल्यात त्यांच्या हात, पाय तसेच शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली. मात्र प्रसंगावधान राखत महेश यांनी अस्वलाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी महेश यांना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी महेश यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे सांगितले.

दरम्यान, वन विभागाच्या डीसीएफ एन. ई. क्रांती, एसीएफ बसवराज वाळद, कणकुंबीचे आरएफओ देवेंद्र माने तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली. या घटनेची नोंद कणकुंबी झोन वन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी शाळांमध्ये मराठी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा; खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Spread the love  बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *