Saturday , August 22 2026
Breaking News

आमदार प्रकाश हुक्केरी यांची कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार प्रकाश हुक्केरी यांची नवी दिल्लीत कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्याच्या विविध विकासकामांसाठी केंद्राकडून आवश्यक निधी, मंजुऱ्या आणि सहकार्य मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.

कर्नाटक सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून केंद्राकडे जीएसटी नुकसानभरपाई, कर वाटपातील राज्याचा हिस्सा आणि विविध योजनांअंतर्गत मिळणाऱ्या निधीबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्याला हक्काचा निधी वेळेत आणि पूर्ण प्रमाणात मिळवून देणे हे हुक्केरी यांच्यासमोरील प्रमुख आव्हान मानले जात आहे.

याशिवाय केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांतील प्रलंबित अनुदाने, पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक आर्थिक मदत आणि दिल्लीतील विविध मंत्रालयांमध्ये रखडलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळवून देण्यासाठी त्यांना सातत्याने समन्वय साधावा लागणार आहे. राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमातील प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, म्हादई, कृष्णा आणि कावेरी नदी पाणीवाटपाशी संबंधित आंतरराज्यीय प्रश्न हे देखील त्यांच्या कामकाजातील महत्त्वाचे विषय ठरणार आहेत. या संवेदनशील मुद्द्यांवर केंद्र सरकार, संबंधित मंत्रालये आणि विविध यंत्रणांशी समन्वय राखत राज्याच्या हिताचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालय तसेच पर्यावरण मंत्रालयाकडून विविध सिंचन आणि जलसंपदा प्रकल्पांना आवश्यक मंजुऱ्या मिळवून देण्यासाठीही त्यांना सक्रिय भूमिका बजावावी लागणार आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने केंद्राशी प्रभावी संवाद साधत कर्नाटकच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता प्रकाश हुक्केरी यांच्या खांद्यावर आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कॅपिटल वन संस्थेला २१.६५ लाखांचा विक्रमी नफा; सभासदांना ८ टक्के लाभांश

Spread the love  बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *