Wednesday , June 17 2026
Breaking News

कन्नड फलकसक्तीविरोधात २२ जूनच्या भव्य मोर्चासाठी आजपासून जनजागृती मोहीम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर आणि सीमाभागात सुरू असलेल्या कन्नड फलकसक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता आक्रमक भूमिका घेतली असून, २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजपासून व्यापक जनजागृती मोहिमेला प्रारंभ करण्यात येत आहे. मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी समितीचे कार्यकर्ते शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

जनजागृती मोहिमेची सुरुवात आज (दि. १५) शिवाजीनगर परिसरातून होणार असून, पुढील काही दिवस शहरातील विविध भागांमध्ये मोर्चाचा प्रचार करण्यात येणार आहे. नागरिकांना पत्रकांचे वितरण करून मोर्चामागील भूमिका आणि उद्दिष्टे समजावून सांगितली जाणार आहेत.

आजच्या जनजागृती मोहिमेत शिवाजीनगर परिसर, आरटीओ सर्कल, चव्हाट गल्ली, जालगार गल्ली, खडक गल्ली, कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, भातकांडे गल्ली, बुरुड गल्ली, हंस टॉकीज रस्ता, बापट गल्ली, कडोलकर गल्ली, नरंगुदकर भावे चौक, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड आणि हुतात्मा चौक या भागांचा समावेश आहे.

समितीने विशेषतः युवा कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसह विविध डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून मराठी भाषिक समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी हा मोर्चा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे समितीने म्हटले आहे. २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या या मोर्चात शहर व सीमाभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

जनजागृती मोहिमेमुळे मोर्चासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि मराठी भाषिकांच्या भावना अधिक प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचतील, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांच्या फेस रिडिंग हजेरी प्रणालीचा पहिलाच दिवस गोंधळात; तांत्रिक अडचणींमुळे उपस्थिती नोंदविण्यात अडथळे

Spread the love  बेळगाव : सरकारी शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *