Wednesday , July 15 2026
Breaking News

शाळा क्र. ३३ च्या परिसरातील धोकादायक पाण्याची टाकी हटवणार; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेचे तात्पुरते स्थलांतर

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरण जपण्यासाठी एसडीएमसी समिती, जागरूक पालकवर्ग तसेच शाळाप्रेमी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ३३ च्या परिसरातील धोकादायक आणि जीर्ण झालेली पाण्याची टाकी हटविण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले असून, येत्या आठ दिवसांत ती पाडून हटविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

शाळेच्या आवारातील धोकादायक पाण्याच्या टाकीची आज जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) श्रीमती लीलावती हिरेमठ आणि गट शिक्षणाधिकारी (बीईओ) रवी बजंत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी संबंधित विभागामार्फत तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून आठ दिवसांच्या आत टाकी हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

शाळेच्या आवारात उंच काँक्रीटच्या खांबांवर उभारण्यात आलेली ही मोठी पाण्याची टाकी गेल्या दोन दशकांपासून वापराविना जीर्ण अवस्थेत उभी आहे. कालांतराने तिची अवस्था अधिकच धोकादायक बनल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक नागरिक, पालक आणि एसडीएमसी सदस्यांनी सातत्याने टाकी हटविण्याची मागणी लावून धरली होती.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर अलीकडेच बेळगाव महापालिकेच्या कर्नाटक शहरी विकास पायाभूत सुविधा विभागाच्या अभियंत्यांनी शाळेला भेट देऊन टाकी हटविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती.

आजच्या पाहणीवेळी शाळेच्या एसडीएमसी सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष शिवनगेकर, विनायक पाटील, विनायक कार्लेकर, मोहन बेनके, नितीन पाटील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत टाकी हटविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत शाळा तात्पुरती अन्यत्र हलविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी एसडीएमसी सदस्यांसोबत पर्यायी जागेची पाहणी केली असून, येत्या सोमवारपासून शाळेचे त्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श होऊन दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *