Wednesday , July 15 2026
Breaking News

बेळगावात अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची धडक कारवाई; दोन जण अटकेत, कारसह घातक शस्त्रे जप्त

Spread the love

 

बेळगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये दोन कार आणि दोन घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून एकूण सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी अँटी स्टॅबिंग स्क्वॉडचे पथक गस्त घालत असताना सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करणाऱ्या सर्वेश अभिजित कंग्राळकर (वय 26, रा. मारुती नगर, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील केए-20/आरयु-6685 क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये बेकायदेशीररीत्या ठेवलेला ड्रॅगन चाकू आढळून आला. प्राथमिक तपासात हे शस्त्र गुन्हेगारी हेतूने बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली.

या कारवाईत मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय मणिकंठ पुजारी व त्यांच्या पथकाने ड्रॅगन चाकू आणि कार असा सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 151/2026 दाखल करण्यात आला असून आर्म्स अॅक्ट 1959 कलम 27(1) आणि कर्नाटक पोलीस कायदा 1963 कलम 97 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याच दिवशी करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत प्रेम बालू चौगुले (वय 31, रा. शाहापूर, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या केए-22/ईएन-9784 क्रमांकाच्या कारमध्ये बेकायदेशीररीत्या ठेवलेली जांबिया (कुकरी) आढळून आली. हे शस्त्र गुन्हेगारी हेतूसाठी बाळगण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात पीएसआय रुक्मिणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जांबिया व कार जप्त केली. या कारवाईतही सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 152/2026 दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मार्केट पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

दरम्यान, शहरात घातक शस्त्रांवर अंकुश ठेवण्यासाठी अँटी स्टॅबिंग स्क्वॉडकडून सातत्याने कारवाया सुरू असून, या यशस्वी कारवायांबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी विशेष कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श होऊन दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *