Monday , August 17 2026
Breaking News

ऑटोनगर व रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करा : किरण जाधव यांची केंद्राकडे मागणी

Spread the love

 

बेळगाव : उत्तर विधानसभा मतदारसंघातील ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढवून औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावी, अशी मागणी भाजप युवा नेते किरण जाधव यांनी केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी बेळगाव शहर भेटीवर आलेल्या केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांची भेट घेऊन त्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले.
उत्तर मतदारसंघातील ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांमध्ये शेकडो लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत असून हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. मात्र उद्योगांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधांचा विकास झालेला नसल्याने उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी श्रीनिवास यांच्या निदर्शनास आणून दिले.
औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे आधुनिकीकरण, सुसज्ज जलनिस्सारण व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्त्यावरील दिव्यांची व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच उद्योगांसाठी आवश्यक इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष योजना व निधी मंजूर करावा, अशी मागणी ही त्यांनी केली.
यावेळी किरण जाधव यांनी सांगितले की, बेळगाव हे देशातील महत्त्वाच्या औद्योगिक शहरांपैकी एक असून येथील फाउंड्री, अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यामुळे ऑटोनगर आणि रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाला विशेष प्राधान्य दिल्यास नवीन गुंतवणूक आकर्षित होईल आणि स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी औद्योगिक विकासाशी संबंधित विषय गांभीर्याने विचारात घेऊन संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी मुक्तियार पठाण यांच्यासह स्थानिक उद्योजक आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *