Monday , December 8 2025
Breaking News

इस्कॉनची हरे कृष्ण रथयात्रा उत्साहात संपन्न

Spread the love

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने काढण्यात आलेल्या राधा- कृष्ण, गौर- निताय हरेकृष्ण रथयात्रेस रविवारी सकाळी दहा वाजता नाथ पै चौक शहापूर येथून प्रारंभ झाला.
इस्कॉनचे परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्च विग्रहांचे पूजन करुन यात्रेस प्रारंभ करण्यात आला. शहापूर विभागातील पोलीस अधिकाऱ्यानिही उपस्थित राहून यात्रेस चालना दिली.
नाथ पै चौकामधून हरिनामाच्या गजरात वाजत गाजत निघालेली ही रथयात्रा बेळगावकरांचे खास आकर्षण ठरली होती. सजवलेल्या रथामध्ये श्री राधाकृष्ण आणि गौर निताय यांचे सुशोभित केलेले आर्चविग्रह दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. एका वेगळ्या रथावर इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्या पुढे सजवलेल्या बैल जोड्या आणि भगवंताच्या जीवनावरील प्रसंग दर्शवणारे काही चित्ररथ सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ हंदिगनुर येथून आलेल्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सातत्याने सुरु होता. त्यामध्ये सहभागी झालेल्या पुरूष व महिला उत्साहाने भजन सादर करीत होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनाम संकिर्तन करणाऱ्या भक्तांचे समूह सहभागी झाले होते. वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी झेंडे घेऊन भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचणारे युवक व युवती सहभागी झाल्या होत्या.
एका बाजूने स्त्रिया तर दुसऱ्या बाजूने पुरुष दोरखंडाने रथ ओढत होते. रथ मार्गावरील अनेक नागरिक रथ ओढण्यात सहभागी होत होते. रथावर श्री भक्ती रसामृत स्वामी महाराज हेही विराजमान झाले होते. रथावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. तसेच फळे देऊन आरती केली जात होती. भक्तजनाकडून मिळालेली फळे आणि प्रसाद रस्त्याशेजारी थांबलेल्या नागरिकांना वाटले जात होते. रथयात्रा खडेबाजार शहापूर मार्गे बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊन तेथून पुढे महात्मा फुले रोड वरून पुढे गोवा वेसकडे मार्गस्थ झाली.
वाटेत ठिकठिकाणी सरबत व पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. सालासार भक्त समूहाच्या वतीने गोवावेस जवळ खास स्टॉल लावण्यात आला होता.

आकर्षक रांगोळ्या
मंजिरी रेणके यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या सुमारे 20 तरुणी रथयात्रा मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढत होत्या. काही मिनिटातच घातल्या जाणाऱ्या या रांगोळ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. संपूर्ण रथयात्रा मार्गावर प्रसाद पाकिटांचे वितरण केले जात होते. रथयात्रा गोवावेस मार्गे इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिराजवळ दुपारी अडीचच्या सुमारास पोचली.

पावसामुळे काही कार्यक्रम रद्द

गेले दोन-तीन दिवस संध्याकाळच्या सुमारास होणाऱ्या पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन ही रथयात्रा यंदा सकाळीच काढण्यात आली. त्याचप्रमाणे मंदिराच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या मंडपातील कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र मंदिरात सायंकाळी सर्व कार्यक्रम झाले. साडेसहा वाजता भजनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. सात वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे विशेष प्रवचन झाले. त्यानंतर रात्री सव्वा आठ वाजता नाट्य लीला झाल्यावर प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले. रथयात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी मंदिर रात्री दहा वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. शेकडो भक्तांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *