बेळगाव : दोन कोटी रुपयांच्या विमा दाव्याच्या लोभापोटी निवृत्त सैनिकाची कट रचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. घटप्रभा आणि यमकनमर्डी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाचा यशस्वी छडा पोलिसांनी लावला.
मृताची ओळख संदीप कलगौडा मंजरगी (वय ४६) अशी झाली आहे. त्यांच्या नावावर एचडीएफसी आणि एसबीआय बँकांमार्फत विमा पॉलिसी काढण्यात आली होती. रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास सुमारे दोन कोटी रुपयांचा विमा मिळणार असल्याने, ही रक्कम मिळविण्याच्या उद्देशाने पत्नी सुमा संदीप मंजरगी हिने इतर आरोपींच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
तपासानुसार, संदीप मंजरगी हे दुचाकीवरून पडून जखमी झाल्यानंतर त्यांना घटप्रभा येथील जे. जी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सुमा मंजरगी आणि आरोपी पुंडलीक विठ्ठल डोंबर यांनी सलाईनमधून विष मिसळल्याचा तसेच झोपेच्या गोळ्या देऊन त्यांचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर हा मृत्यू रस्ते अपघातामुळे झाल्याचे भासविण्यासाठी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दाखल करण्यात आली. तसेच शवविच्छेदन अहवालात विषबाधेचा उल्लेख येऊ नये यासाठी काही संबंधित व्यक्तींच्या मदतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप तपासात समोर आला आहे.
पोलिसांनी मृतदेह पुन्हा बाहेर काढून नव्याने शवविच्छेदन केले असून, तपासादरम्यान हे प्रकरण हत्येचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित कलमांनुसार गुन्ह्याचे रूपांतर करण्यात आले. गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेल्या विषाच्या बाटल्या, सिरिंज, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणात सुमा मंजरगी, तिचा कथित प्रियकर पुंडलीक याच्यासह अप्पासाब नाईकवाडी, चन्नप्पा अडविस्वामीमठ, नागराजू, अशोक गुजनाळ, बसवराज बस्मे, राहुल जोगी आणि आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपास पथकाच्या कामगिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta