बेळगाव : सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेशी निगडित असलेल्या कन्नड सक्तीविरोधात २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेला मोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार असून प्रशासनाच्या दबावाला किंवा दडपशाहीला बळी न पडता मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हावे, असे ठाम आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक बुधवारी (दि. १७) मराठा मंदिर, ओव्हर ब्रिज बेळगाव येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते.
बैठकीच्या प्रारंभी रणजित चव्हाण-पाटील यांनी प्रास्ताविकातून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, काल जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून २२ जून रोजीचा महामोर्चा स्थगित करण्याची विनंती केली होती. मात्र, मराठी भाषिकांवरील अन्याय, कन्नड सक्ती आणि सीमा भागातील नागरिकांच्या न्याय्य हक्कांबाबत कोणतेही ठोस आश्वासन प्रशासनाकडून मिळाले नाही. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना आणि हक्कांसाठी हा मोर्चा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे म्हणाले, “मराठी भाषिकांच्या स्वाभिमानाचा, भाषिक अधिकारांचा आणि अस्मितेचा प्रश्न हा केवळ आंदोलनाचा विषय नसून अस्तित्वाचा लढा आहे. प्रशासनाने मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली असली तरी मराठी जनतेच्या न्याय्य मागण्यांबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे २२ जूनचा मोर्चा हा मराठी एकजुटीचा आणि लोकशक्तीचा विराट आविष्कार ठरणार आहे.”
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या निर्णयावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत २२ जून रोजी कन्नड सक्तीविरोधी मोर्चा शंभर टक्के काढण्यात येणार असल्याचा निर्धार समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यासोबत समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मोर्चा रद्द करून केवळ २०० प्रतिनिधींनी निवेदन सादर करावे तसेच या विषयावर पुन्हा चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र समितीने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावत मोर्चा नियोजित वेळेनुसार आणि मोठ्या संख्येने काढण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.
याचबरोबर २० जून रोजी कोल्हापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवेळी सीमा प्रश्नासंदर्भात निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने कोल्हापूर येथे उपस्थित राहून सीमा प्रश्नाचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, सीमा प्रश्नाच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याच्या भूमिकेतून २९ जून रोजी मुंबई येथे धरणे आंदोलनही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या नेत्यांनी दिली.
बैठकीत सरचिटणीस मालोजी अष्टेकर, आबासाहेब दळवी, ऍड. एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, पियूष हावळ, अनिल पाटील, बी. डी. मोहनगेकर, नेताजी जाधव, शिवाजी खांडेकर, मनोहर हुंदरे, नारायण सांगावकर, राजाराम देसाई, पांडुरंग सावंत, लक्ष्मण होनगेकर, गोपाळ देसाई यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. त्याचबरोबर मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर व्यापक जनजागृती करण्याचे आणि मोर्चा अभूतपूर्व यशस्वी करण्याचे आवाहन केले.
बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी एकमुखाने ठराव मंजूर करत मराठी भाषा, संस्कृती आणि अधिकारांच्या रक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. २२ जून रोजी बेळगावमध्ये मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठी बांधव रस्त्यावर उतरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta