बेळगाव : तालुक्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या महसूल विभागालाच वीजबिल भरण्यासाठी निधी नसल्याचे धक्कादायक वास्तव बेळगाव तहसीलदार कार्यालयात उघड झाले आहे. तब्बल १ लाख ७१ हजार रुपयांच्या थकीत वीजबिलामुळे हेस्कॉमने मंगळवारी तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केल्याने संपूर्ण कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीतील पाच वीजमीटरची अनेक महिन्यांची थकबाकी प्रलंबित होती. हेस्कॉमकडून वारंवार नोटिसा व स्मरणपत्रे देऊनही बिलाची रक्कम जमा करण्यात आली नाही. अखेर संयमाचा अंत होत मंगळवारी वीजपुरवठा तोडण्याची कारवाई करण्यात आली.
वीजपुरवठा खंडित होताच संपूर्ण कार्यालय अंधारात बुडाले. संगणक, प्रिंटर आणि ऑनलाइन यंत्रणा बंद पडल्याने दाखले, महसूल नोंदी, जमीनविषयक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आदी सर्व सेवा ठप्प झाल्या. कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, तर अनेकांना काम न होताच परत जावे लागले.
डिजिटल युगात महसूल विभागाचे बहुतांश काम संगणकीय प्रणालीवर अवलंबून असल्याने वीजेशिवाय एकही काम करणे अशक्य बनले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तहसील कार्यालयाने मंगळवारी सायंकाळी थकीत वीजबिल लवकरात लवकर भरले जाईल, असे लेखी आश्वासन हेस्कॉमला दिले. त्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आणि कामकाज सुरळीत झाले.
मात्र दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने कर्मचारी आणि नागरिक दोघांचाही मोठा खोळंबा झाला. महसूल वसुलीचे प्रमुख केंद्र असलेल्या तहसील कार्यालयालाच वीजबिलासाठी निधी उपलब्ध नसल्याची बाब प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरत असून याची शहरभर चर्चा सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta