Monday , August 17 2026
Breaking News

एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

Spread the love

 

पथसंचलन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बेळगाव : देशभक्तीचा जागर, शिस्तबद्ध पथसंचलन आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना देशसेवेबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा देण्यात आली.

सीआरपीएफ कोब्रा जंगल स्कूल, बेळगावचे कमांडंट यादवेंद्र सिंग यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सीआरपीएफचे उपकमांडंट झेड. के. यादव यांच्यासह राजेश शिवलकर, पंकज शिवलकर, बेला शिवलकर, हिमांगी प्रभू, गायत्री गावडे, सिद्धार्थ हुंदरे, प्राचार्या शोभा कुलकर्णी, प्राचार्य एम. बी. हुंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला आणि उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

देशसेवेच्या विविध संधींची विद्यार्थ्यांना माहिती

यादवेंद्र सिंग यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच एनसीसी, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांसारख्या क्षेत्रांमध्ये असलेल्या संधींची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यामध्ये करिअर घडवावे. सकारात्मक विचारसरणी ठेवत आनंदी जीवन जगावे आणि सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. अभ्यासात यश मिळविण्यासाठी योग्य नियोजन, सातत्य आणि मेहनत आवश्यक असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम, देशसेवा आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा संदेश देण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांची ओळख कुमारी प्रार्थना कुलकर्णी हिने करून दिली. स्वातंत्र्यदिनाची माहिती कुमारी प्रतीक्षा राजपुरोहित हिने सांगितली. कुमार आरव पाखनावर याने स्वागतपर भाषण केले. प्राध्यापिका वैदेही जाधव यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रगती भरमेनावर आणि कुमारी सिया पाटील यांनी केले. कुमारी सृष्टी नेसरकर हिने आभार मानले.

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्ती, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय ठरला.

About Belgaum Varta

Check Also

स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या संध्या किरण सेवा केंद्रात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्राच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *