
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनगोळ परिसरानंतर काँग्रेस रोड आणि परिसरातील अवैध अतिक्रमणांवरही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई करत रस्ते व पदपथ मोकळे केले. पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडलेल्या या मोहिमेत स्टॉल, पत्र्याचे शेड तसेच काही अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
महानगरपालिकेने यापूर्वी अनगोळ नाका ते मराठी शाळा या मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याच मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून काँग्रेस रोड आणि लगतच्या गल्ल्यांमध्ये कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटविण्यात आली असून जप्त करण्यात आलेले साहित्य तात्पुरत्या साठवणीसाठी महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सार्वजनिक रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवणे, वाहतूक सुरळीत करणे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम आवश्यक असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस रोडवरील अतिक्रमणे हटवल्यानंतर परिसरात लक्षणीय बदल दिसून येत असून रस्ता अधिक मोकळा झाला आहे. मात्र, वडगाव मेन रोडवरील पदपथांवर फरशी, प्लंबिंग व बांधकामासाठीचे साहित्य तसेच पत्र्याची शेड उभारून अडथळे निर्माण झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे तेथील अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांनी केवळ तात्पुरती मोहीम न राबवता शहरात अतिक्रमणविरोधी सातत्यपूर्ण आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. अन्यथा हटविलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहत असल्याने मोहिमेचा उद्देशच निष्फळ ठरत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta