Saturday , August 22 2026
Breaking News

एमपीएससीची २६१९ पदांसाठी मेगाभरती; सीमाभागातील ८६५ गावांतील युवकांसाठी मोठी संधी

Spread the love

 

बेळगाव : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सीमाभागातील हजारो युवक-युवतींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क संवर्गातील तब्बल २६१९ रिक्त पदांच्या मेगाभरतीची अधिसूचना जाहीर केली असून, महाराष्ट्राने दावा केलेल्या बेळगाव परिसरातील ८६५ मराठी भाषिक गावांतील पात्र उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ अंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये लिपिक-टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, कर सहायक, उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहायक या पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठीची संयुक्त पूर्व परीक्षा २७ सप्टेंबर २०२६ रोजी संगणकाधारित (CBT) पद्धतीने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

१० जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार, महाराष्ट्राने दावा केलेल्या सीमाभागातील ८६५ मराठी भाषिक गावांतील रहिवासी उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. अर्ज भरताना अधिवासासंदर्भातील आवश्यक पर्याय स्वीकारावा लागणार असून, अंतिम निवडीनंतर कागदपत्र पडताळणीवेळी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला विहित नमुन्यातील वास्तव्याचा दाखला सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

या मेगाभरतीत लिपिक-टंकलेखक पदासाठी सर्वाधिक १८६४ जागा उपलब्ध असून, सहायक मोटार वाहन निरीक्षक – ४६१, कर सहायक – २८२, उद्योग निरीक्षक – ९ आणि तांत्रिक सहायक – ३ अशा एकूण २६१९ पदांची भरती करण्यात येणार आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण आणि इतर अटी आयोगाच्या अधिकृत अधिसूचनेत नमूद करण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची धावपळ टाळून वेळेत अर्ज भरावेत आणि परीक्षा शुल्क भरून अर्ज निश्चित करावा, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

सीमाभागातील मराठी युवकांसाठी ही केवळ नोकरीची संधी नसून, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत प्रवेश मिळविण्याची महत्त्वाची संधी असल्याने या भरतीकडे विशेष लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

अमरावतीत आंबोली पब्लिक स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय थल सैनिक शिबिरासाठी निवड

Spread the love  रायफल शूटिंगमध्ये सार्जंट श्रीपाद तार्लेकर यांना सुवर्णपदक; CQMS राज बागवे यांचीही राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *