Monday , August 24 2026
Breaking News

व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल १८३.५० रुपयांनी स्वस्त; तेल कंपन्यांचा मोठा दिलासा

Spread the love

 

नवी दिल्ली : महागाईच्या झळा सहन करणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांना सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल १८३.५० रुपयांची कपात जाहीर केली आहे. नव्या दरानुसार दिल्लीत या सिलेंडरची किंमत १,९३० रुपये इतकी झाली आहे.

याचबरोबर ५ किलो वजनाच्या फ्री ट्रेड एलपीजी (एफटीएल) सिलेंडरच्या किमतीतही १३ रुपयांची घट करण्यात आली असून, आता हा सिलेंडर ८०८.५० रुपयांना उपलब्ध होणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, कॅटरिंग व्यवसाय तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांना या दरकपातीमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

अमेरिका-इराण संघर्षाची तीव्रता कमी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्वपदावर येऊ लागला आहे. परिणामी जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता निर्माण होत असून त्याचा परिणाम देशांतर्गत एलपीजीच्या दरांवरही दिसून आला आहे.

मात्र, घरगुती ग्राहकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीला घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली होती. दुसरीकडे, व्यावसायिक आणि एफटीएल गॅस सिलेंडरच्या किमतीत मागील काही महिन्यांत सातत्याने वाढ झाल्याने व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला होता. आता झालेल्या दरकपातीमुळे या वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने १ जुलैपासून पेट्रोल निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क प्रतिलिटर १.५० रुपयांवरून ४ रुपये इतके वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत इंधनाचा पुरेसा पुरवठा कायम राहावा आणि अधिक नफ्यासाठी तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर पेट्रोलची निर्यात करू नये, या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे इंधन व एलपीजीच्या किमतींमध्ये आगामी काळातही चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

CEIRच्या मदतीने मार्केट पोलिसांनी शोधले १२३ हरवलेले मोबाईल

Spread the love  बेळगाव : नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *