Thursday , July 2 2026
Breaking News

सखी ग्रुपचा वटपौर्णिमा महिला मेळावा उत्साहात; विविध स्पर्धांनी रंगली सांस्कृतिक पर्वणी

Spread the love

बेळगाव : महिलांमध्ये सांस्कृतिक परंपरांचे जतन, परस्पर स्नेह वृद्धिंगत करणे आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सखी ग्रुपच्या वतीने दि. 26 जून रोजी खडेबाजार येथील श्री नामदेव देवकी संस्थेत आयोजित करण्यात आलेला वटपौर्णिमा विशेष महिला मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सुमारे 80 महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

मेळाव्यात उखाणे स्पर्धा, पूजा ताट सजावट स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा तसेच ‘आदर्श सावित्री’ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेला महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेचा, आत्मविश्वासाचा आणि सांस्कृतिक जाणिवेचा उत्कृष्ट आविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सर्वप्रथम उपस्थित राहिलेल्या महिलांचे विशेष स्वागत करण्यात आले. त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आल्याने प्रारंभापासूनच कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना साडी व सौभाग्य अलंकार, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना क्रोकरी सेट व सौभाग्य अलंकार, तर उत्तेजनार्थ विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याशिवाय उपस्थित महिलांसाठी रॅपिड फायर आणि विविध मनोरंजक फन गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमातील सर्व महिलांना डाबर ज्यूसचेही वितरण करण्यात आले.

मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरली ती पारंपरिक वेशभूषा स्पर्धा. या स्पर्धेत लहान मुलींनीही उत्साहाने सहभाग नोंदवून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सहभागाचे कौतुक म्हणून सर्व बालस्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. मनीषा बेनके आणि सौ. विजया नैसर्गिक उपस्थित होत्या. स्पर्धांचे परीक्षण सौ. खुशबू शिरोडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचा समन्वय रश्मी चिकोर्डे यांनी सांभाळला, तर संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना, आकर्षक सजावट आणि प्रभावी सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. एकता गोंदकर यांनी समर्थपणे पार पाडली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांसह अनेक मान्यवरांनी आर्थिक सहकार्य करून उपक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. सहभागी महिला, प्रमुख पाहुणे, परीक्षक तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सखी ग्रुपतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

महिलांना एकत्र आणत सामाजिक ऐक्य दृढ करणे, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन करणे तसेच महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असून, तो या उपक्रमातून यशस्वीरीत्या साध्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतन शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *