
खानापूर : खानापूर तालुका आणि पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे, नदी-नाले आणि जंगल परिसर अत्यंत धोकादायक बनले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वन विभागाने खानापूर तालुक्यातील सर्व प्रमुख धबधबे आणि वनक्षेत्रांमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी लागू केली आहे.
बेळगावचे उपअरण्यसंरक्षणाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. याशिवाय घसरडे रस्ते, दरडी कोसळण्याची शक्यता आणि जंगलातील वाढलेला धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
वन विभागाने नागरिक आणि पर्यटकांना बंदी आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, धबधबे व जंगल परिसरात जाणे टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. प्रतिबंधित भागात प्रवेश करणाऱ्यांविरुद्ध वन कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील सुरला धबधबा, वज्रपोहा (जांबोटी) धबधबा, कणकुंबी परिसरातील धबधबे, भीमगड अभयारण्यातील नैसर्गिक धबधबे, तसेच भीमगड वन्यजीव अभयारण्य, जांबोटी, कणकुंबी, सुरला घाट, तिलारी बॅकवॉटर आणि म्हादई नदी परिसर हे पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते. मात्र सध्याच्या अतिवृष्टीमुळे हे सर्व परिसर धोकादायक बनल्याने पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांनी या ठिकाणी जाणे टाळावे, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत धबधबे आणि नदी परिसरात घडलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असून, नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta