Tuesday , August 25 2026
Breaking News

एसआयआर प्रक्रियेसाठी मराठीतील अर्ज तात्काळ उपलब्ध करा; महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

Spread the love

 

बेळगाव : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना अर्ज (Enumeration Forms) तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांची भेट घेऊन केली.

माजी नगरसेवक तथा ॲड. अमर येळूरकर यांनी आयुक्तांना निवेदन सादर करत बेळगाव दक्षिणसह मराठी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडणूक आयोगाच्या १६ सप्टेंबर २००८ च्या आदेशानुसार मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले.

निवेदनात सध्या सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेसाठी अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्यामुळे मराठी भाषिक मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या भाषिक व लोकशाही हक्कांवर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, २०२४ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने भारत निवडणूक आयोग आणि भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी, कर्नाटक यांनी मराठी व कन्नड या दोन्ही भाषांमध्ये मतदार याद्या प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मराठीत मतदार याद्या आणि संबंधित साहित्य उपलब्ध करून दिल्याची आठवणही यावेळी करून देण्यात आली.

मराठीतील अर्ज उपलब्ध होईपर्यंत संबंधित मतदारसंघांमधील एसआयआर प्रक्रिया स्थगित करावी, तसेच भविष्यात अर्ज, नोटिसा, मतदार याद्या आणि जनजागृती साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, उपमहापौर रेणू किल्लेकर, संजय शिंदे, रणजित चव्हाण पाटील, सुधा भातकांडे, रेणू मुतगेकर, सुनील बाळेकुंद्री तसेच माजी नगरसेवक, नगरसेविका आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एपीएमसी पोलिसांकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा छडा; ६.११ लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

Spread the love  बेळगाव : एपीएमसी पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *