Tuesday , August 25 2026
Breaking News

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात हिंदी पाठ्यक्रम कार्यशाळा उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान व गृहविज्ञान महाविद्यालय, एम.कॉम. व एम.एस्सी. स्नातकोत्तर केंद्र, बेळगाव तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी विषयाच्या नव्या पाठ्यक्रमासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विविध पदवी महाविद्यालयांतील हिंदी प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. सुरेखा कामुले या होत्या. प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून आर.पी.डी. महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. राजेंद्र पोवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. दीपा अंटीन यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.

राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. डी. एम. मुल्ला यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट करून उपस्थितांचे स्वागत केले तसेच अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. राजेंद्र पोवार यांनी हिंदी विषयाच्या नवीन पाठ्यक्रमाची रचना, उद्दिष्टे, अध्यापन पद्धती, मूल्यमापन प्रक्रिया तसेच विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.

अध्यक्षीय भाषणात प्रा. सुरेखा कामुले यांनी अशा प्रकारच्या शैक्षणिक कार्यशाळा शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीसाठी व अध्यापनाच्या गुणवत्तावाढी साठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यांनी महाविद्यालय व हिंदी प्राध्यापक संघाच्या संयुक्त उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी हिंदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निवृत्त प्राध्यापक डॉ. जी. पी. साळे, प्राचार्यपदी पदोन्नती झाल्याबद्दल डॉ. एस. ए. जहागीरदार, सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. कोमल जवळकर, शिक्षण क्षेत्रात विशेष प्रशस्ती मिळाल्याबद्दल डॉ. दीपा अंटीन तसेच प्रा. तेजस्विनी अक्कोळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. जी. पी. साळे व डॉ. एस. ए. जहागीरदार यांनी आपल्या भावना व्यक्त करत शिक्षकांनी सातत्याने अध्ययन, संशोधन व गुणवत्तापूर्ण अध्यापनावर भर द्यावा, असे आवाहन केले.

या कार्यशाळेस बी.ओ.ई. चेअरमन प्रा. एम. ए. पिराॅं आणि विविध महाविद्यालयांतील हिंदी विभागप्रमुख, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण शैक्षणिक, विचारमंथनात्मक आणि प्रेरणादायी होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघाच्या सचिव डॉ. प्रेमा गाडवी यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, आयोजक व सहभागी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

About Belgaum Varta

Check Also

मतदार यादीचा मसुदा सर्व तहसीलदार, तालुका पंचायतींमध्ये प्रकाशित : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love  बेळगाव : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष व्यापक सुधारणेची प्रक्रिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *