Tuesday , August 25 2026
Breaking News

न्यू गुड्स शेड रस्त्याच्या तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी; महापालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : डेक्कन हॉस्पिटलसमोरील, बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील न्यू गुड्स शेड रस्त्याची तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना जलनिस्सारण गटारी उभाराव्यात, अशी मागणी समाजसेवक गणेश दड्डीकर यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यापूर्वी १० जून २०२६ रोजीही याच मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या सेक्शन ऑफिसर यांनी जागेची पाहणी करून रस्ता लवकरच दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एल अँड टी कंपनीने केलेल्या कामानंतर हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि दैनंदिन प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक किरकोळ अपघात झाले असून महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खड्डेमय रस्त्यामुळे पाठदुखी व इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये साचलेले चिखलमिश्रित पाणी विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशावर उडत असून आरोग्याचाही धोका वाढत आहे. तर उन्हाळ्यात धुळीचे प्रदूषण वाढून वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट न्यू गुड्स शेड रस्त्यावर येत असल्याने दरवर्षी रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीबरोबरच दोन्ही बाजूंना योग्य जलनिस्सारण गटारी बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

कायमस्वरूपी काम सुरू होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजने म्हणून रस्त्यावर स्टोन डस्ट किंवा वेट मिक्स टाकून रोड रोलरद्वारे समतल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र हा केवळ तात्पुरता उपाय असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पावसाळ्यातही कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे दड्डीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच, या निवेदनाची पोहोच देऊन रस्त्याच्या पाहणीची, कायमस्वरूपी दुरुस्तीची तसेच जलनिस्सारणाच्या कामांची संभाव्य कालमर्यादा लेखी स्वरूपात कळवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर रस्त्यावरील कचरा तातडीने हटवा; समाज सारथी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

Spread the love  बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावरील केएलई रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून त्याचे वर्गीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *