

बेळगाव : सरकारी माध्यमिक शाळांतील सहशिक्षकांना सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयातील व्याख्याता पदावर पदोन्नती देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी घेण्यात आलेल्या पात्रता परिषदेत 50 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे ४ जुलैपर्यंत तीन प्रतींमध्ये सादर करावीत, असे निर्देश जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या संचालकांच्या २० जूनच्या आदेशानुसार ही पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. पात्रता परिषद उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची विषयानिहाय यादीही प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये कन्नड, इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश आहे.
बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित पात्र शिक्षकांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून निश्चित मुदतीत कार्यालयात सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सर्व कागदपत्रे संबंधित मुख्याध्यापकांकडून प्रमाणित असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या प्रक्रियेनंतर प्राप्त कागदपत्रांची छाननी करून पात्र शिक्षकांच्या पदवी पूर्व महाविद्यालयातील व्याख्याता पदावरील पदोन्नतीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांनी निर्धारित मुदतीत सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून सादर करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta