Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूरात पावसाचा कहर; बेळगाव जिल्हा अक्षरशः जलमय!

Spread the love

 

सहा दिवसांत विक्रमी २६४.२ मिमी पाऊस; नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः धडक दिली असून गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः खानापूर तालुक्यावर पावसाचा सर्वाधिक मारा झाला असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.

कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निरीक्षण केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, १ ते ६ जुलै या अवघ्या सहा दिवसांत जिल्ह्यात ३३.६ मिमी पावसाचा अंदाज असताना प्रत्यक्षात तब्बल ७८.६ मिमी पाऊस झाला आहे. त्यात खानापूर तालुक्यात विक्रमी २६४.२ मिमी पावसाची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस याच तालुक्यात झाला आहे.

सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३३.८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये खानापूरमध्ये ५२.४ मिमी पाऊस कोसळला असून बेळगाव शहरासह अनेक भागांत दिवसभर रिमझिम ते मुसळधार सरी कोसळत राहिल्या.

मान्सूनपूर्व कालावधीतही पावसाने अपेक्षेपेक्षा अधिक हजेरी लावली आहे. १ मार्च ते ३१ मे या कालावधीत ९३.१ मिमी पावसाचा अंदाज असताना प्रत्यक्षात १०९.८ मिमी पाऊस झाला असून तो १८ टक्क्यांनी अधिक आहे. या काळात बैलहोंगल तालुक्यात १३७.१ मिमी सर्वाधिक, तर निपाणीत ७४.४ मिमी सर्वात कमी पाऊस झाला.

मात्र जून महिन्यात चित्र काहीसे वेगळे राहिले. १४६.३ मिमी पावसाचा अंदाज असताना प्रत्यक्षात १०४ मिमी पाऊस झाला आणि पर्जन्यमान २९ टक्क्यांनी घटले. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मात्र पावसाने भरपाई करत दमदार पुनरागमन केले आहे.

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाले प्रवाहित झाले असून पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय पर्जन्यमान (मिमी)

बेळगाव – २४.२, खानापूर – ५२.४, बैलहोंगल – ८.७, चिकोडी – ११.७, गोकाक – ३.८, हुक्केरी – १५.५, रामदुर्ग – १.४, रायबाग – ५.५, सौंदत्ती – ३.५, कित्तूर – १४.२, निपाणी – २१.२, कागवाड – ३.७, मुदलगी – २.७, यरगट्टी – २.४ आणि अथणी – ३.३

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *