

निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटाच्या उतारावर वेगाने येणाऱ्या ट्रकची कारला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात कोल्हापूर येथील दोन मेडिकल रिप्रेजेंटिव्ह (वैद्यकीय प्रतिनिधी) जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता.६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की, अपघातग्रस्त ट्रकसह कारचा पूर्णतः चक्काचूर झाला. शिवाय ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतवडीत (मातीत) जाऊन अडकला. तर कार चक्काचूर होत संरक्षण कठड्याला जाऊन धडकली.
या अपघातात सोहेल अब्दुलरहीम मणेर (वय ३६, मुळगाव सांगरूळ ता. करवीर जि. कोल्हापूर, सध्या राहणार गजानन कॉलनी फुलेवाडी, कोल्हापूर) व विनोद हैबतराव पाटील (वय ३२, रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. नहीम हसीमपिर मोमीन (वय ३२, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) व अंजुम राजेखान पिंजार (वय ३५, रा. किणी वाठार, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर कोल्हापूर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात दरम्यान तवंदी परिसरात पाऊस सुरू होता. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना रस्ता दिसत नव्हता. तरीही सुसाट वेगाने ट्रक चालक वाहन चालवीत असल्याने हा अपघात घडल्याची चर्चा सुरू आहे. मंगळवारी (ता.७) येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घाटातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय उड्डाणपूलही पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे वाहन चालक सुसाट वेगाने वाहने चालवीत आहेत. त्यामुळेच अपघात होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घाटातील अपघात टाळण्यासाठी दिशादर्शक फलक आणि स्पीड ब्रेकर निर्माण करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta