Sunday , July 26 2026
Breaking News

हिंडलगा कारागृहात सावरकरांची प्रतिमा, नामफलकासाठी १३ जुलैला श्रीराम सेनेचा एल्गार

Spread the love

 

बसस्थानक, रेल्वे स्थानक व विमानतळावर सावरकरांच्या प्रतिमा उभारण्याची मागणी; स्मृती जतनासाठी राज्य सरकारकडे निवेदन

बेळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील वास्तव्य हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक वारसा असून त्या स्मृतीचे जतन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हिंडलगा कारागृहात सावरकरांची प्रतिमा व नामफलक तातडीने उभारावा, तसेच बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावरही त्यांच्या प्रतिमा स्थापित करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी प्रमोद मुतालिक यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

बुधवारी बेळगाव येथील सरकारी विश्रामधामात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुतालिक यांनी या मागण्यांसाठी १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हिंडलगा मध्यवर्ती कारागृहासमोर ‘वीर सावरकर अभिवादन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आल्याची घोषणा केली. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून सावरकरांच्या स्मृतींचा योग्य सन्मान करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुतालिक म्हणाले की, १९५० साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंडलगा कारागृहात तीन महिन्यांचा कारावास भोगला होता. या ऐतिहासिक घटनेची नोंद असतानाही कारागृहात त्यांच्या स्मरणार्थ प्रतिमा किंवा नामफलक नसणे ही अत्यंत खेदजनक बाब असून हा सावरकरांसह देशभक्तांचा अवमान असल्याचा आरोप त्यांनी केला.

कर्नाटकमध्ये भाजप सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्र्यांनी सावरकरांना ठेवण्यात आलेल्या कोठडीला भेट देऊन तेथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले होते. मात्र, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर ती प्रतिमा हटविण्यात आली आणि त्या विशेष कोठडीचा दर्जाही बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

१३ जुलैच्या कार्यक्रमातून राज्य सरकारकडे हिंडलगा कारागृहात सावरकरांची प्रतिमा व नामफलक उभारणे, बेळगाव बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर त्यांच्या प्रतिमा स्थापित करणे, शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सावरकरांच्या कार्यावरील स्वतंत्र धडा समाविष्ट करणे, त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणारे उपक्रम राबविणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१३ जुलै १९५० रोजी सावरकरांची हिंडलगा कारागृहातून मुक्तता झाली होती. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगून या कार्यक्रमाला भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुतालिक यांनी दिली. तसेच सावरकरप्रेमी, देशभक्त नागरिक आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यंकटेश शिंदे, विनय आंब्रोळी, बाळू पवार, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह श्रीराम सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *