Monday , September 21 2026
Breaking News

मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Spread the love

 

५०० हून अधिक सेविका-मदतनीसांचे ठिय्या आंदोलन : प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढण्याची मागणी

बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, या मागणीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंबेडकर गार्डन येथून निघालेला मोर्चा चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या आंदोलनात ५०० हून अधिक सेविका व मदतनीस सहभागी झाल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना, “जिल्हाधिकारी स्वतः येऊन निवेदन स्वीकारत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवत ‘काळा दिवस’ पाळण्यात आला.

२०१८ पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शासनाकडून वारंवार आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कोणताही निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. वाढती महागाई लक्षात घेऊन मानधनात तातडीने वाढ करण्याबरोबरच इतर प्रलंबित मागण्याही निकाली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी ‘फ्रेंड्स’ योजनेतील अडचणीही आंदोलकांनी मांडल्या. आधार कार्ड, स्मार्टफोन किंवा ओटीपीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे लहान मुलांच्या पोषण आहारासह गर्भवती आणि स्तनदा महिलांच्या लाभांवरही परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले.

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह सर्व प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *