Sunday , September 20 2026
Breaking News

नीट गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगावात तीव्र आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका गळती प्रकरणासह विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा निषेध करत बेळगावात गुरुवारी युथ काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. राणी चन्नम्मा चौकात झालेल्या या निदर्शनांमध्ये दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रश्नपत्रिका गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय आणि योग्य आर्थिक मदत देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनादरम्यान गेल्या काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका वारंवार फुटल्याचा आरोप करण्यात आला. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मुसळधार पावसातही विद्यार्थी आणि पालक आंदोलनात ठामपणे सहभागी झाले. गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी मोठे त्याग करत असताना परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या कथित लाठीचार्जाचाही त्यांनी निषेध नोंदविला.

यावेळी बोलताना अमान सेठ यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या संस्थेमध्ये अत्यल्प कायमस्वरूपी कर्मचारी असून मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामकाज अवलंबून असल्याचा आरोप त्यांनी केला. हे आंदोलन कोणत्याही राजकीय हेतूने नसून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेच्या मागणीसाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *