Sunday , August 16 2026
Breaking News

बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती वैचारिक पद्धतीने साजरी

Spread the love

 

मच्छे : येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. सुशील धामणेकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर आयोजित चर्चासत्रामध्ये संतोष जैनोजी, विनायक चौगुले, केतन चौगुले, संदीप वाघोजी व प्रशांत नांदोडकर, गजानन मजुकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर विचारमंथन केले. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, समाजप्रबोधनाचे कार्य, शाहिरी आणि साहित्यावर सखोल चर्चा करण्यात आली.

अण्णाभाऊ साठे यांचे औपचारिक शिक्षण अवघे दीड दिवस झाले असले, तरी प्रचंड जिद्द आणि ज्ञानाची ओढ यामुळे त्यांनी मुंबईतील दुकानांवरील पाट्या वाचत स्वअध्ययनातून ज्ञान संपादन केले. पुढे त्यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील कष्टकरी, वंचित आणि शोषित घटकांचे जीवन प्रभावीपणे मांडले. “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा विचार आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

“माझी मैना गावाकडे राहिली” ही त्यांची शाहिरी आजही रसिकांच्या ओठांवर आहे. त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले असून, त्यांच्या कार्याला देश-विदेशात गौरव प्राप्त झाला आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यास आजच्या तरुणांनी करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कादंबऱ्या व इतर साहित्य उपलब्ध असून, वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

शांतीनगर टिळकवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Spread the love  बेळगाव : टिळकवाडी शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *