


बेळगाव (पत्रकार – राधिका सांबरेकर) : मैत्री… विश्वासाचा हात, आपुलकीची सावली आणि आयुष्यभर साथ देणारे निस्वार्थ नाते. रक्ताच्या नात्यांइतकीच घट्ट, पण कोणत्याही बंधनात न अडकलेली ही भावना प्रत्येकाच्या आयुष्याला नवा अर्थ देते. म्हणूनच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा फ्रेंडशिप डे हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून, आयुष्य समृद्ध करणाऱ्या मैत्रीचा उत्सव ठरतो.
“मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव…
भरून काढते आयुष्यात प्रत्येक नात्याची उणीव…”
या ओळी बेळगावमधील अनेक महिला अक्षरशः जगताना दिसतात. संसार, नोकरी, जबाबदाऱ्या आणि कुटुंबाच्या व्यापातून स्वतःसाठी काही क्षण राखून ठेवण्याचा सुंदर मार्ग म्हणजे भिशी ग्रुप. आर्थिक बचतीसोबतच मानसिक आधार, आनंद, हसरे क्षण आणि जिवाभावाच्या मैत्रिणींची साथ देणारे हे ग्रुप आज महिलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.
वय, जात, धर्म, आर्थिक स्थिती किंवा सामाजिक स्तर यांचा कोणताही भेद न करता केवळ जिव्हाळा आणि विश्वासाच्या धाग्यांनी जोडलेल्या या मैत्रिणी महिन्यातून एकदा तरी एकत्र येतात. गप्पा, हास्यविनोद, सहली, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि सुख-दुःखांची मनमोकळी देवाणघेवाण यामुळे या भेटी प्रत्येकासाठी ऊर्जा देणाऱ्या ठरतात.
फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बेळगावमधील अशाच काही प्रेरणादायी महिला मैत्री समूहांचा घेतलेला हा विशेष आढावा…
संस्कारी ग्रुप : मैत्रीचा सुगंध जपणारा परिवार


‘स्वतःसाठी एक दिवस’ या संकल्पनेतून सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संस्कारी ग्रुपमध्ये ३५ ते ५० वयोगटातील बारा मैत्रिणी सहभागी आहेत. केवळ एक हजार रुपयांच्या भिशीतून सुरू झालेला हा प्रवास आज मैत्रीच्या मजबूत बंधात परिवर्तित झाला आहे.
दर महिन्याला एकत्र येत भिशी फोडणे, मनमोकळ्या गप्पा, सुख-दुःखांची देवाणघेवाण, वाढदिवस साजरे करणे, पर्यटनस्थळांना भेटी देणे आणि प्रत्येक भेट अविस्मरणीय बनविणे, ही या ग्रुपची खासियत आहे. प्रत्येक भेटीनंतर नव्या उत्साहाने आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते, असे सदस्य सांगतात.
हिरकणी ग्रुप : ‘एज डझंट मॅटर’चा जगणारा मंत्र


“रोज भेट झाली नाही तरी चालेल; पण आठवण आली की भेट व्हावी,” या विचारातून नम्रता महागावकर यांनी स्थापन केलेला हिरकणी ग्रुप गेली आठ-नऊ वर्षे मैत्रीचा सुंदर वारसा जपत आहे.
आठ महिलांचा हा ग्रुप दरमहा अडीच हजार रुपयांची भिशी भरतो. वर्षातून दोन सहली, थीमनुसार वेशभूषा, फोटोशूट, वाढदिवस आणि सणांचे जल्लोषात आयोजन हे या ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. ३५ ते ६० वयोगटातील महिला “वय हा फक्त आकडा आहे” हे आपल्या उत्साहातून सिद्ध करताना दिसतात.
सुहासिनी मंडळ : तीन पिढ्यांना जोडणारे मैत्रीचे विश्व




पटवर्धन लेआउट, वडगाव येथील सुहासिनी मंडळची स्थापना २०१४ मध्ये झाली. “स्कूलमेट आणि कॉलेजमेट असतात, मग कॉलनीमेट का नसावेत?” या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मंडळात आज सुमारे ९० महिला सहभागी आहेत.
३० ते ७५ वयोगटातील महिलांसह आजी, आई, मुलगी, सून, नात आणि पतवंडांपर्यंत तीन-चार पिढ्या या मैत्रीच्या बंधात एकत्र आल्या आहेत. महिला दिन, तिळगुळ समारंभ, श्रावणोत्सव, नवरात्रोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटक, खेळ आणि सामाजिक उपक्रमांमधून या महिलांनी मैत्रीला नव्या उंचीवर नेले आहे.
याच मंडळांतर्गत मान्सून भिशी ग्रुप, हम पाच, राजदरबार भिशी, योगा भिशी, राज्यकन्या ग्रुप अशा विविध समूहांच्या माध्यमातून महिलांना व्यक्त होण्याचे, शिकण्याचे आणि आनंदाने जगण्याचे व्यासपीठ मिळाले आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात भिशी ग्रुप हा केवळ आर्थिक व्यवहाराचा विषय राहिलेला नाही. तो मानसिक आरोग्य, सामाजिक संवाद, आत्मविश्वास आणि आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा देणारा मैत्रीचा सशक्त आधार बनला आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने बेळगावमधील या महिलांनी जपलेली मैत्रीची ही परंपरा समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta